उत्तर प्रदेश पोलिसांना धमकी देणाऱ्या २० वर्षीय युवकास भद्रकालीतून अटक

उत्तर प्रदेश पोलिसांना धमकी देणाऱ्या २० वर्षीय युवकास भद्रकालीतून अटक

उत्तर प्रदेश पोलिसांना धमकी देणाऱ्या २० वर्षीय युवकास भद्रकालीतून अटक

नाशिकरोड । उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बाॅम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्याला अटक केल्यानंतर त्या आरोपीला सोडून द्या अन्यथा परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देणाऱ्या नाशिकमधील युवकाला दहशतवादविरोधी पथकाने अटक करुन उत्तर प्रदेशच्या एसटीएफ पथकाच्या ताब्यात दिले. नाशिकच्या भद्रकाली येथून या २० वर्षीय तरुणाला या प्रकरणात अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक दहशतवादविरोधी पथकाच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाॅम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोमती नगर पोलीस ठाणे लखनौ येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात एका आरोपीला अटक करुन २३ मे रोजी काळाचौकी दहशतवादी विरोधी पथक, मुंबई यांनी एसटीएफ उत्तर प्रदेश पथकाच्या ताब्यात दिले होते. त्याला न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आली आहे. मात्र, या आरोपीला अटक केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांना पुन्हा धमकीचा संदेश गेल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली होती.

या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला सोडून द्या अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा धमकी वजा संदेश एका इसमाने उत्तर प्रदेश पोलीसांच्या सोशल मीडियावर टाकला,  अशी माहिती उत्तर प्रदेश एसटीएफ पथकाने महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाला दिली होती. या माहितीच्या आधारे नाशिक दहशतवादी विरोधी पथकाने भद्रकाली परिसरातील एका २० वर्षीय युवकाला ताब्यात घेतल्यावर त्याने सदर गुन्हा कबुल केला. त्यानंतर उत्तरप्रदेश एसटीएफ पथकाच्या ताब्यात दिल्याची माहिती नाशिक एटीएस पथकाने दिली.

अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई पोलीस आयुक्त दहशतवाद विरोधी पथक, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप घुगे, सहायक पोलीस निरीक्षक अनिता पाटील, पोलीस उपनिरिक्षक राजाराम सानप, हवालदार संपत जाधव, एजाज पठाण, अलीम शेख, युसूफ पठाण, सुदाम सांगळे, अभिजित बेलेकर, अजित गिते, दीपक राऊत, गोविंद जाधव व दहशतवादी विरोधी पथक, नाशिक युनिट यांनी अवघ्या २४ तासात ही कामगिरी यशस्वी पार पाडल्याने अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.

First Published on: May 25, 2020 12:55 AM
Exit mobile version