होळीला गेलेले 22 हजार चाकरमानी अडकले कोकणात

होळीला गेलेले 22 हजार चाकरमानी अडकले कोकणात

राज्यात मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी अडकलेले आहेत. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची धडपड सुरू आहे. पण राज्य सरकारने काढलेल्या नव्या आदेशामुळे ना कोकणातील व्यक्ती मुंबई -पुण्यात येऊ शकते ना मुंबई-पुण्यातील व्यक्ती कोकणात जाऊ शकते. याच आदेशामुळे आता होळीसाठी मुंबईत गेलेले चाकरमानी कोकणात अडकले आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात चाकरमानी होळीसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात गेले होते. यातील काहीजण होळी संपल्यानंतर कोकणातून मुंबईला आले. पण संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले आणि होळीसाठी गावी गेलेल्यांपैकी २२ हजार चाकरमानी कोकणातच अडकले.

एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकलेल्या चाकरमान्यांची संख्या 22 हजार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातला आकडा देखील याहून अधिक असेल, असे एका अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे चाकरमानी अडकले आहेत त्यांचे कुटुंब मुंबईत असल्याने आता त्यांना आपल्या बायकामुलांची चिंता सतावू लागली आहे. कोकणात अडकलेल्यांमध्ये महिलांचा समावेश असून, त्यांची मुले, पती मुंबईत असल्याने आपल्या कुटुंबाचे जेवणाचे हाल होत असल्याचे काही महिलांनी सांगितले. तर काही पुरुष मंडळीची स्थिती त्यांचे कुटुंब मुंबईत आणि आपणच गावी अडकलो अशी झाली आहे.

मुंबई-पुण्यात जाण्याची परवानगी द्यावी –
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकलेल्यांमध्ये सावंतवाडी, कणकवली आणि कुडाळ, मालवण तसेच वेंगुर्ला गावातील लोकांचा समावेश असून, या अडकलेल्या चाकरमान्यांना आता मुंबईत आपल्या कुटुंंबाकडे परतायचे आहे. सध्या मुंबई-पुण्यामध्ये वाढणार्‍या करोना रुग्णांमुळे गावी अडकून बसलेल्या या लोकांना मुंबईतील आपल्या कुटुंबाची काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे गावी अडकून पडलेल्या मुंबई-पुणे आणि ठाणे येथील चाकरमान्यांना परतायचे असेल तर त्यांना शासनाने त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

दरवर्षी मी होळीला एकटाच येतो तसा यावर्षी देखील आलो होतो. पण देशात झालेल्या लॉकडाऊनमुळे मी माझ्या गावी अडकून पडलो असून, माझी बायको आणि मुले मुंबईत आहेत. त्यामुळे सरकारने परप्रांतीय मजुरांबाबत जशी तळमळ दाखविली तशी कोकणात अडकून पडलेल्या चाकरमान्यांबाबत दाखवावी अशी प्रतिक्रिया कोकणात अडकलेल्या एका चाकरमान्याने ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

करोनामुळे राज्य सरकारने काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत. त्यानुसार मुंबई-पुण्यातील व्यक्ती कोकणात आणि कोकणातील व्यक्ती मुंबईत जाऊ शकत नाही. तरी देखील होळीला गेलेले काहीजण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकले असतील तर या संदर्भात मी वरिष्ठांशी बोलून घेईन.
-दिपक केसरकर, आमदार, शिवसेना

First Published on: May 6, 2020 6:59 AM
Exit mobile version