पुण्यातील २३६ अभियंत्यांनी गमावली नोकरी

पुण्यातील २३६ अभियंत्यांनी गमावली नोकरी

प्रातिनिधिक फोटो

पुण्यातील एका नामवंत कंपनीने आपल्या २०० हून अधिक कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकल्याची घटना समोर आली आहे. ZF स्टीयरिंग गिअर कंपनीचे नाव असून यात कार्यरत असलेल्या २३६ अभियंत्यांना काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अभियंत्यांनी कंपनीला न सांगता सुट्टी घेतली असल्याचे मॅनेजमेंटने सांगितले आहे. याबाबत एक पत्रकही कंपनीने प्रकाशित केले आहे. एकाच वेळी २३६ अभियंत्यांना नोकरी गमवावी लागली असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा स्वर उमटत आहे.या कर्मचाऱ्यांनी एकत्र सुट्टी घेतली असल्यामुळे कंपनीने ही कारवाई केली. सुट्टीवरजाण्यापूर्वी या कर्मचाऱ्यांनी कोणतीही नोटीस दिली नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

डिसेंबर मध्ये घेतली होती सुट्टी

कंपनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे अभियंता मागील काही महिन्यांपासून कंपनीत कार्यरत होते. २ डिसेंबर २०१७ ते १९ जानेवारी २०१८ दरम्यान त्यांनी कंपनीला कोणतीही पूर्व कल्पना न देता सुट्टी घेतली होती. ZF स्टीयरिंग गिअर ही मुळ जर्मन कंपनी असून तिच्या पुणे शाखेमध्ये हा प्रकार घडला. अशोक लेईलँड, टाटा मोटर्स, व्होल्वो ग्रुप, एएमडब्ल्यू मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा अशा कंपन्यांना ही कंपनी गाड्यांचे भाग पूरवते. एकत्र सुट्टीवरून आल्यानंतर अभियंत्याना सुट्टीवर जाण्याचे कारण विचारण्यात आले होते. तसेच या अभियंत्यांची चौकशीही करण्यात आली होती. या चौकशीमध्ये दोषी ठरल्यामुळे अभियंत्यांवर ही कारवाई करण्यात आली.

First Published on: October 30, 2018 3:27 PM
Exit mobile version