पीएमपीएमएलच्या ताफ्यात २५ एसी इलेक्ट्रिक बस

पीएमपीएमएलच्या ताफ्यात २५ एसी इलेक्ट्रिक बस

PMPML Bus

पीएमपीएमएलच्या ताफ्यात पहिल्या २५ एसी इलेक्ट्रिक बस समाविष्ट होण्याच्या निविदेस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याच्या पेठांमध्येदेखील सहजपणे प्रवास करू शकतील, अशा २५ बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचे कंत्राट महापालिकेत दाखल करण्यात आले आहे.

येत्या २६ जानेवारीपासून ३१ सीटरच्या २५ बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. पूर्णपणे वातानुकुलित असणार्‍या या बस कमी दरात नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. या बसच्या भाड्यासाठी प्रतिकिलोमीटर ४० रुपये ३२ पैसे दर आकारण्यात आला आहे. दररोज या बसचा २२५ किमीचा प्रवास करणे अपेक्षित आहे. या सगळ्या बसेस बीआरटी कंप्लायंट आहेत.

ओलेक्ट्रा ग्रीनटेक या कंपनीला या बसेस तयार करण्याचे कंत्राट मिळाले आहे. या बसच्या चार्जिंगची आणि देखभालीची जबाबदारी कंपनीची राहणार आहे. मात्र, बसच्या चार्जिंगसाठी पालिका वीज पुरवणार आहे. रात्री ४.५ रुपये प्रति किलोमीटर असा चार्जिंगचा खर्च आकारण्यात येणार आहे. सकाळसाठी ६ रुपये प्रति किलोमीटर खर्च आकारण्यात येणार आहे. सुरुवातीला या बसेस निगडी ते भेकराईनगर मार्गावर धावणार आहेत. यानंतर पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होणार्‍या ३५० बसेससाठी वेगळी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.

First Published on: December 8, 2018 4:31 AM
Exit mobile version