औरंगाबादमध्ये ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात, 25 जण जखमी

औरंगाबादमध्ये ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात, 25 जण जखमी

औरंगाबादमध्ये ट्रक आणि एसटीचा अपघात

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत राज्यात अपघातांच्या संख्येत वाढ झालेली आहे. अशीच एक अपघाताची बातमी औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. जिल्ह्यातील आडूळ परिसरात काल सोमवारी (ता. 19 जून) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर या घटनेनंतर ट्रक चालक हा घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अपघातातील जखमींना औरंगाबाजदमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. या घटनेनंतर परिसरात सुमारे अर्धा किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा – MPSC परीक्षेत तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारची हत्याच, पोस्टमार्टम रिपोर्टमधून निष्पन्न

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबादवरून एक मालवाहतूक ट्रक जात होता. यावेळी या ट्रकला आडळू परिसरात एसटी बसने ओव्हरटेक केले. ज्यानंतर या ट्रकने बसला मागून धडक दिली. एसटीला मागून जोरदार धडक बसल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकाला जाऊन धडकली. या घटनेनंतर ट्रक चालक हा घटनास्थळावरून ट्रक घेऊन पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेत या ट्रकने बसला इतकी जोरदार धडक दिली की, बसमधून प्रवास करणारे तब्बल 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. तर या अपघातातील ट्रक चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यातील वेगवेगळ्या भागांत अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनांमध्ये अनेक निष्पाप लोकांना आपले  प्राण गमवावे लागले आहेत. तर सर्वाधिक अपघात हे समृद्धी महामार्गावर घडले आहेत. ज्यामुळे वाहन चालकांसोबत प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर महामार्गावर एकमेकांना ओव्हरटेक करताना अपघात घडत असल्याने वाहन चालकांसाठी यासाठी कडक नियम घालून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

First Published on: June 20, 2023 10:13 AM
Exit mobile version