गडचिरोलीचा स्वप्नील चालला गुगलला…

गडचिरोलीचा स्वप्नील चालला गुगलला…

swapnil-bangre

गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित भागात त्याचा जन्म, लोडशेडिंगसारख्या प्रश्नामुळे अभ्यासात सातत्याने अडथळा, अशा वातावरणात कॉम्प्युटरचा अभ्यास करणे जिकरीचेच. पण तो डगमगला नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज त्याने थेट गुगलमध्ये प्रवेश मिळवित उभ्या महाराष्ट्राची शान अभिमाने उंचविली आहे. ही यशस्वी कहाणी आहे गडचिरोलीच्या स्वप्नील बांगरे याची. स्वप्नीलची निवड गुगल आणि युडॅसिटीच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमासाठी झाली असून मोबाईलच्या अ‍ॅन्ड्रॅाईड प्रणालीचा अभ्यास त्याला करता येणार आहे.

भारतात अ‍ॅन्ड्रॅाईड ही मोबाईल प्रणाली डेव्हलप करण्यासाठी गुगल आणि युडॅसिटी या संस्थेतर्फे विशेष स्कॉलरशीप सुरु केली आहे. यासाठी जगभरातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यंदाही या शिष्यवृत्तीचे आयोजन करण्यात आले असून ज्यात गडचिरोलीच्या स्वप्नील बांगारे याची निवड करण्यात आली आहे. स्वप्नील हा नॅनोडिग्रीचा विद्यार्थी असून भारतात अ‍ॅन्ड्रॅाईड डेव्हलपर्ससाठी गुगल- युडॅसिटी स्कॉलरशिप कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात त्याची निवड झाली आणि तो अँग्युलरजेएस अ‍ॅप्लिकेशनवर काम करणार आहे. वयाच्या चौथ्या वर्षी स्वप्नीलने कॅम्प्युटर पाहिला होता. त्याचवेळी त्याला कॅम्प्युटरचे आर्कषण वाटले होेते. पण गडचिरोलीसारख्या ठिकाणी राहत असल्याने त्याला तो वापरायची संधी मिळाली नाही. इतकेच नव्हे तर शाळेत असताना त्याने शिक्षकांना कॅम्पुटर कसा वापरायचा याबद्दल विचारणा केली तेव्हा ‘इंजिनिअर हो त्यानंतर कॅम्प्युटर शिक’, असे खोचक उत्तर त्याला मिळाले होते. मात्र त्यानंतरही तो डगमगला नाही. दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्याच्या कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केले.

काय आहे गुगल-युडॅसिटी स्कॉलरशिप

या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत गुगलच्या माध्यमातून अ‍ॅन्ड्रॉईडचे शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी एकूण १हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात स्वप्नीलचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटिलिजेंट, मशिन लर्निंग, डीप लर्निंग आणि रोबोटिक्ससारखे अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. या संपूर्ण प्रवासाबद्दल सांगताना तो म्हणाला की, शिष्यवृत्ती मिळणे हे उडण्यासाठी पंख मिळाल्यासारखे होते. ही अद्भुत संधी प्राप्त झाल्यामुळे मला एक चांगला लीडर आणि अ‍ॅन्ड्रॅाईड डेव्हलपर बनण्यास मदत झाली. मी तरुणांना असे आग्रहाने सांगू इच्छितो की, जर तुम्हाला काही शिकायचे असेल, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी युडॅसिटीचे माझे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांचा आभारी आहे.

First Published on: September 7, 2018 2:15 AM
Exit mobile version