Karjat Light Issue : …अन् ग्रामस्थांचे टीव्ही, फ्रिज, मिक्सर, पंप जळाले

Karjat Light Issue : …अन् ग्रामस्थांचे टीव्ही, फ्रिज, मिक्सर, पंप जळाले

फार्महाऊसवर मेहेरबानी करताना गरीब ग्रामस्थांची विजेची उपकरणे जळाली

नेरळ : कर्जत तालुक्यात अगोदरच विजेचा लपंडाव सुरू आहे. अशातच कर्जत तालुक्यातील आसलपाडा येथे ग्रामस्थांची विजेवरील उपकरणे एका दिवसात जळाली आहेत. आसलपाडा गावापासून जंगलच्या भागात असलेल्या एका फार्महाऊसला नव्याने वीजजोडणीची लाइन टाकण्यात आली. खासगी ठेकेदाराने हे काम केले. तर काम पूर्ण झाल्यावर वीज पुरवठा सुरू करताना त्यात तांत्रिक बिघाड होऊन अनेकांचे नुकसान झाले, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे आम्हाला नुकसानभरपाई द्यावी अन्यथा न्यायासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हेही वाचा… Raigad Alibaug Crime News : चक्री जुगार अड्ड्यांवर कुणाचा वरदहस्त?

नेरळपासून आसलपाडा अंदाजे चार किलोमीटवरवर आहे. या गावाच्या काही अंतरावर जंगल भागात एका मुंबईतील धनिकाने फार्महाऊस तयार केला आहे. यासाठी आसल ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतली नाही, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. तर या फार्महाऊससाठी वीज जोडणी मिळावी, अशी मागणी संबंधित फार्म मालकाकडून महावितरणकडे करण्यात आली होती. यासाठी काही पोल उभे करावे लागणार होते. हे काम फार्ममालकाने खासगी ठेकेदाराकडून करून घेतले. मात्र हे काम करताना ठेकेदाराकडून काहीतरी गफलत झाली. त्यामुळे वीजप्रवाह सुरू केल्यावर ३० ते ४० ग्रामस्थांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, बोरिंग पंप, मिक्सर अशी विद्युत उपकरणे जळाली आहेत. त्यामुळे संबंधित फार्महाऊसच्या मालकाने आम्हाला या वस्तुंची भरपाई करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा…  Raigad Matheran Tourism : माथेरानच्या पर्यटन उत्पन्नावर रेल्वेची नजर

दरम्यान याबाबत पोलीस ठाण्यात देखील आम्ही रीतसर तक्रार देणार आहोत. कुणीही मुंबईतील धनिकांनी गावात घर, फार्म बांधताना किमान ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे आणि ग्रामस्थांना दादागिरी करू नये असे, ग्रामस्थांनी सांगितले. झालेल्या नुकसानीबाबत ग्रामस्थ आक्रमक असन त्यांना नुकसानभरपाई मिळणार की हा वाद चिघळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फार्महाऊसचे वीजजोडणीचे काम करत असताना गावातील लोकांचे नुकसान झाले आहे. आमच्या घरातला फ्रिज सुद्धा जळाला आहे. त्यामुळे मी त्या फार्महाऊसवरील साहेबाना भेटून नुकसानीविषयी सांगितले. तर त्यांनी उर्मटपणे उत्तर देत तुम्हाला काय करायचे ते करा म्हणत धमकी दिली. त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहोत. फ्रिज दुरुस्तीसाठी ६ हजार रुपये खर्च येणार आहे. हा खर्च कसा करायचा, असा सवाल ग्रामस्थ रविना राजेश शेंडे यांनी केला आहे.

परवानगीशिवाय फार्महाऊस

मी सरपंच असताना या फार्महाऊससाठी कुठलीही परवानगी देण्यात आली नव्हती. आताही कुठलीही परवानगी दिलेली नाही. संबंधित फार्महाऊसचा मालक यम उर्मट भाषेत बोलतो. त्यांच्यासाठी विजेची लाईन टाकताना ग्रामस्थांना त्रास झाला. गरीब ग्रामस्थांच्या विजेच्या उपकरणाच्या अनेक वस्तू जळाल्या आहेत. याची नुकसानभरपाई मिळावी, अशी आमची मागणी आहे. – रमेश लदगे, माजी सरपंच, आसलपाडा ग्रामपंचायत

माहिती नाही

आसलपाडा येथे फार्महाऊससाठी वीजजोडणी मिळावी, असा अर्ज आमच्याकडे आला होता. तेव्हा त्यांचा सातबारा बघून आम्ही परवानगी दिली. यासाठी ग्रामपंचायत ‘ना हरकत दाखला’ आदी आम्हाला गरजेच्या नाहीत. लाईन टाकताना काही चूक झाली का, याबाबत संबधित कनिष्ठ अभियंत्यांशी बोलून चौकशी करतो. याबाबत मला अद्याप काही माहिती नाही.

– प्रकाश देवके, उपअभियंता, महावितरण

ग्रामस्थांनी उर्मट वागणे

मुंबईतील धनिक येथे बंगले, फार्महाऊस बांधतात. त्यांच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. पण येथे येऊन गरीब ग्रामस्थांना कुणी धमकावत असेल, दादागिरी करत असेल तर ग्रामस्थांनी ते का सहन करायचे? आज येथील फार्महाऊस मालकामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले तरीही तो ग्रामस्थांशी उर्मट भाषेत बोलतो. येथील झाड तोडण्यात आली, याबाबत आम्ही पोलीस ठाणे व वनविभागात रीतसर तक्रार करू. – संदेश कराळे, ग्रामस्थ

(Edited by Avinash Chandane)

First Published on: April 30, 2024 9:01 PM
Exit mobile version