राज्यातील तुरूंगात कोरोनाचं थैमान! २८४ कैद्यांसह कर्मचारी पॉझिटिव्ह तर १५ जणांचा मृत्यू

राज्यातील तुरूंगात कोरोनाचं थैमान! २८४ कैद्यांसह कर्मचारी पॉझिटिव्ह तर १५ जणांचा मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा हा वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासात ५८ हजार ९५२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसांपासून बड्या नेत्यांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून आता महाराष्ट्रातील तुरूंगातही कोरोनाचं थैमान सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या राज्यभरातील तुरूंगात कोरोनाचे २८४ सक्रिय रूग्ण आहेत. यामध्ये १९८ कैदी तर ८६ तुरूंग कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. यासह या जीवघेण्या कोरोनाने १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ७ कैदी आणि ८ तुरूंग कर्मचारी असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

दरम्यान, तुरूंगात देखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याने तुरूंगातील कैद्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत १ हजार ३२६ कैद्यांना तर ३ हजारांहून अधिक तुरूंगातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या सुरुवातीला देशभरात कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान होतं. तिहारमध्येही मोठ्या संख्येने कैदी एकत्र राहत असल्याने त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर त्यांना इमर्जन्सी पॅरोल देण्याचा आदेश देण्यात आला होता. कोरोनामुळे तुरुंगात गर्दी होऊ नये, यासह कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून दिल्लीच्या तिहार जेलमधूनही ६ हजार ७४० कैद्यांची इमर्जन्सी पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. मात्र आता ३ हजार ४६८ कैद्यांचा कोणताही थांगपता लागत नसल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात तसेच दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. दिल्लीतील तिहार जेलच्या ६८ पेक्षा अधिक कैदी आणि १० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये तुरुंग अधीक्षक तसेच जेलमधील दोन डॉक्टरांचाही समावेश आहे.


First Published on: April 15, 2021 1:21 PM
Exit mobile version