Corona Update: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख पार!

Corona Update: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख पार!

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात मागील २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ४९३ नवे रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १ हजार १४१वर पोहोचला आहे. तर आज २४ तासांत १२७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांच्या आकडा ३ हजार ७१७ झाला आहे. तसेच २४ तासांत १ हजार ७१८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ४७ हजार ७१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज राज्यात एकूण ४९ हजार ६१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.३ टक्के एवढे आहे. तर मृत्यू दर ३.७ टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ७९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १ हजार ५५३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ६७ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत ९०, ठाणे ११, कल्याण डोंबिवली ३, वसई विरार १, मीरा भाईंदर १, नाशिक २, धुणे १, पुणे १२, सांगली ३, औरंगाबाद २ आणि अमरावतीमध्ये १ जणाचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ९२ पुरुष तर ३५ महिला आहेत. १२७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६७ रुग्ण आहेत तर ५२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२७ रुग्णांपैकी ८९ जणांमध्ये (७०%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३७१७ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २० मे ते ९ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५५, ठाणे -१०, सांगली -३, कल्याण डोंबिवली – २,पुणे -२, मीरा भाईंदर – १, वसई विरार – १, नाशिक -१, धुळे -१आणि अमरावती – १ मृत्यू असे आहेत.


हेही वाचा – Coronavirus: राज्यात ४८ तासांत १२९ पोलीस कोरोनाबाधित!


 

First Published on: June 12, 2020 8:32 PM
Exit mobile version