राज्यात उन्हाचा पारा वाढला; दोन दिवसात उष्माघाताने ४ जणांचा मृत्यू

राज्यात उन्हाचा पारा वाढला; दोन दिवसात उष्माघाताने ४ जणांचा मृत्यू

ऐन पावसाळ्यात मुंबईकरांची होतेय लाहीलाही!

मुंबईसह संपूर्ण राज्यभरात उन्हाचा पारा वाढला आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुष्कील झाले आहे. गर्मी आणि घामामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत. अशामध्ये बीडमध्ये आज उष्माघाताने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल परभणी तालुक्यातील बोंदरगाव येथील एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. तर अकोल्यामध्ये देखील एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोन दिवसात राज्यात आतापर्यंत एकूण ४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

बीडमध्ये दोन जणांचा मृत्यू 

आज बीडमध्ये तापमानाचा पारा वाढला ४५ अंश डिग्री सेल्सिअल्स आज तापमान होते. तापमान वाढीमुळे जिल्ह्यातील सर्वच नागरिक हैराण झाले असून घराबाहेर पडणे मुश्लिक झाले आहे. तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे बीडमध्ये उष्माघाताच्या लाटेत दोन जणांचा बळी गेला आहे. बीड शहरातील माळीवेस भआगात राहणारे शिक्षक चंद्रकांत हिरवे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. ते चक्कर येऊन बेशुध्द पडले त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तर दुसरीकडे अंबाजोगाई तालुक्यातील बनसारोळा येथे पोस्टमनचा मृत्यू झाला आहे. विक्रम गायकवाड या अनुकंपा तत्वावर पोस्टाचे काम करत होते. टपाल वाटप करुन घरी आल्यानंतर त्यांना ताप आला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अकोला आणि परभणीत दोन जणांचा मृत्यू 

परभणी तालुक्यातील बोंदरगाव येथील एका शेतकऱ्याचा शनिवारी उष्माघाताने मृत्यू झाला. सोमेश्वर सपकाळ असे उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमेश्वर सपकाळ यांनी बोंदरगाव शिवारातील आपल्या शेतात दिवसभर उन्हात काम केले. सध्या ज्वारीचे खळे असल्यामुळे त्यांनी शेतातील आखाड्यावर रात्री मुक्काम केला. मात्र, शनिवारी सकाळी ते शेतात बेशुध्दावस्थेत पडलेले दिसले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अकोल्यातही एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. शेषराव नामदेव जवरे असे त्या उष्माघातात बळी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात या युवकाचा मृतदेह आढळून आला असून, या प्रकरणी रामदास पेठ पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आज अमरावती, अकोला, चंद्रपूर, वर्ध्यात सध्या तापमान ४६ अंश सेल्सिअस आहे. तर कोल्हापूर, नाशिक, पुण्यामध्ये ४५ अंश सेल्सिअस तापमान आहे.

First Published on: April 28, 2019 7:06 PM
Exit mobile version