चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ४ जण जखमी, नुकसानाचे पंचनामे सुरू – उदय सामंत

चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ४ जण जखमी, नुकसानाचे पंचनामे सुरू – उदय सामंत

प्रातिनिधिक छायाचित्र

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात ४ जण जखमी झाले असले तरी जीवितहानी झाली नसल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच नुकसानाचे पंचनामे सुरू झाले असून, त्याबाबत २ दिवसात भरपाई रक्कम सरकारी नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती देखील उदय सामंत यांनी दिली. हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून, पाऊस थांबताच नुकसानाचे सर्वेक्षण सुर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वाऱ्याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढरा समुद्रापर्यंत आली. ही नाव किनाऱ्याला आणली असून, यावरील १३ खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश आल्याचे देखील सामंत यांनी सांगितले. तसेच हे खलाशी डिझेल पुरवठा करून परतण्यासाठी निघाले होते. परंतु वादळाच्या सुचनेमुळे थांबले. या प्रवाशांमध्ये १० भारतीय असून, ३ परदेशी आहेत. यामुळे या सर्वांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब घेतले जातील, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सामंत म्हणाले.

हे जहाज खडकावर आदळून त्याला छिद्र पडल्याने वापरून झालेले इंजिन ऑइल सांडले. परंतु धोका नाही. बोट महिनाभर येथेच राहील. मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे असेही त्यांनी सांगितले.

First Published on: June 3, 2020 5:58 PM
Exit mobile version