४९ हजार बांधकाम कुटुंबांना दिलासा

४९ हजार बांधकाम कुटुंबांना दिलासा

शिधापत्रिका नसलेल्या ४९ हजार बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ

राज्यातील इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत ज्या कामगारांच्या कुटुंबांकडे शिधापत्रिका नाहीत, अशा कुटुंबांना काही योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यांना काही योजनांपासून वंचित राहावे लागते. मात्र आता बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबाना शिधापत्रिका नसताना देखील लाभ घेता येणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतून ४८ हजार ५५३ कुटुंबांना मोफत वैद्यकीय उपचार मिळणार, असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.

महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ घेता येणार

महात्मा जोतिबा फुले योजनेतर्फे अनेक बांधकाम कुटुंबाना दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात विमा कंपनी, कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त बैठका घेण्यात आल्या होत्या. राज्यात सहा लाख कामगार असून ज्या कामगारांकडे पिवळे अथवा केशरी रंगाची शिधापत्रिका आहे, त्यांना या योजनेतून लाभ देण्यात येतो. पण, शिधापत्रिका नसलेले ४८ हजार ५३३ बांधकाम कामगार कुटुंबे असून त्यांनाही महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने निर्णय घेतला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

ओळखपत्रावर योजनेचा लाभ मिळणार

कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगारांना नोंदणीच्या वेळी जे ओळखपत्र देण्यात येते त्यावर कामगाराच्या तपशिलांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा फोटोसह तपशील दिला जातो. कामगार अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेल्या ओळखपत्रावर योजनेचा लाभ मिळणार आहे. संगणक प्रणालीमध्ये कामगारांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून दर तीन महिन्यात नवीन नोंदणी होणाऱ्या कामगारांची यादीदेखील संकलित करण्यात येत आहे.


वाचा – शिधापत्रिकेवर लोह आणि आयोडीनयुक्त मीठ होणार उपलब्ध


 

First Published on: December 5, 2018 8:15 PM
Exit mobile version