नाशकात दोन दिवसात ५ बळी; सलग दुसर्‍या दिवशी पोलिसाचा मृत्यू

नाशकात दोन दिवसात ५ बळी; सलग दुसर्‍या दिवशी पोलिसाचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, दोन दिवसांत ५ कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे. यामध्ये २ पोलीस, वाहनचालक, आरोग्यसेवक व एका पुरुषाचा समावेश आहे. सोमवारी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील बाधित एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना मंगळवारी (दि.२६) कॉलेज रोड भागातील विसेमळा येथील पोलिसाचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी परप्रांतीय कामगारांना चारचाकी वाहनाने उत्तरप्रदेशात पोहोच करुन परतीचा प्रवास करत असलेल्या ठाण्यातील वाहनचालकांना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. आत्तापर्यंत पोलीस मालेगावी बंदोबस्तासाठी गेलेल्या नाशिक जिल्ह्यात तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ५५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत पोलिसाचा रिपोर्ट चार दिवसांपुर्वी आला पॉझिटिव्ह
मालेगावी बंदोबस्तावरुन नाशिक शहरातील कॉलेजरोड भागातील विसेमळा येथील रहिवाशी असलेले 51 वर्षीय पोलीस कर्मचारी शनिवारी (दि.२३) करोनाबाधित असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला. त्यांच्यावर डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते. रविवारी (दि.२४) बाधित त्याच्या कुटुंबातील ३९ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा, १७ व २३ वर्षीय मुली पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मंगळवारी (दि.२६) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

उत्तरप्रदेशात गेलेल्या ठाण्याच्या वाहनचालकाचा मृत्यू
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील 54 वर्षीय चालक परप्रांतीय कामगारांना उत्तरप्रदेशात पोहोच करण्यासाठी खासगी वाहनाने गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर ते परतीचा प्रवास करीत असताना 18 मे रोजी चांदवडमध्ये आले असता त्यांना ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना चांदवड येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 मे रोजी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान त्यांना न्युमोनियाचा त्रास वाढला. त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेल्याने सोमवारी (दि. 25) रात्री त्यांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा 55 पोहचला आहे. तर, परजिल्ह्यातील दुसरा बळी आहे. तीन दिवसांपूर्वी निमोण (ता. संगमनेर) येथील 63 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

First Published on: May 26, 2020 5:01 PM
Exit mobile version