नाशकात पती,पत्नीसह ८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

नाशकात पती,पत्नीसह ८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

देशात समूह संसर्गास सुरुवात IMAचा इशारा

नाशिक जिल्ह्यात मालेगावनंतर आता नाशिक शहर करोनाचे हॉटस्पॉट झाले असून, शनिवारी (दि.३०) शहरात ५ नवे रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये वृंदावननगर, सातपूरमधील 2, सायली निवास ड्रीम कॅस्टल, रिलायन्स पेट्रोलपंप प्रयागग्रीन सोसायटी, चरण पादुका रस्ता, पंचवटी, मनमाड व इगतपुरी येथील प्रत्येकी एक रुग्ण बाधित आहे. आता नाशिक जिल्ह्यात १ हजार १६८ रुग्ण करोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात 183 रुग्ण आहेत.

नाशिक शहरात शुक्रवारी (दि.२९) दिवसभरात सर्वाधिक २६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसेंदिवस शहरात झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने शहरात रुग्ण आढळून आलेला ३४ परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केली आहेत. शहरातील १८३ बाधित रुग्णांपैकी ५० रुग्ण बरे झाले असून १२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरात शनिवारी वृंदावननगर गार्डन, सातपूर येथे ४३ वर्षीय पुरुष व त्याची ३७ वर्षीय पत्नी बाधित आहे. सायली निवास, राधानगर, ड्रीम कॅस्टल येथे २० वर्षीय तरुण, रिलायन्स पेट्रोलपंप, दिंडोरी रोड येथील २९ वर्षीय पुरुष आणि चरण पादुका, पंचवटी येथील २८ वर्षीय तरुण बाधित आहेत.

शहरात ९ परिसर प्रतिबंधित क्षेत्र
शहरात शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी महापालिकेने खबरदारी म्हणून शहरातील ९ परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. कमोद गल्ली-जुने नाशिक, दामोदरनगर-पाथर्डी, पाटील पार्क-जाधव संकुल-अंबड लिंक रोड, गोदापार्क-रामवाडी पूल-पंचवटी, महेबुबनगर-वडाळागाव, प्रयाग ग्रिन्स-कलानगर-वैदुवाडी-पंचवटी, करमा हाईट्स-चिंतामणी प्लाझाजवळ-तपोवन रोड, बाप्पा सिताराम कॉलनी-हिरावाडी रोड, वृंदावन गार्डन-श्रमिकनगर-सातपूर हे प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

लग्नाला आलेल्या वर्‍हाडींचे रिपोर्ट निगेटिव्ह
शिलापूर येथील नवरदेवाच्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती बुधवारी (दि.२७) सध्याकाळी ऐन हळदीचा कार्यक्रम सुरु असताना मिळाली आणि वर्हाडी मंडळीच्या अंगावर काटा उभा राहिला होता. अखेर गुरुवारी (दि.२८) सकाळी सात वाजताच पाच-सहा लोकांच्या साक्षीने सप्तपदी झाली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सावधगिरीचे पाऊल उचलत वर्हाडी मंडळी नवरीला न घेताच आपल्या घरी परतल्याची घटना नाशिकरोड जवळील पळसे येथे घडली होती. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कातील पाचजणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचा रिपोर्ट शनिवारी (दि.३०) निगेटिव्ह आला.

७१ पोलीस क्वारंटाइन
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील १५० हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून तीन कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून मालेगाव येथे बंदोबस्त बजावलेल्या ७१ पोलिसांना आडगाव येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत बाधित पोलीस कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांचे समुपदेशन केले जात आहे. आरोग्याची काळजी, सुरक्षित अंतर, आहार, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. शुक्रवारपर्यंत (दि.२९) ग्रामीण पोलीस दलातील १५० पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उर्वरीत पोलिसांवर उपचार सुरु आहेत.

First Published on: May 30, 2020 9:00 PM
Exit mobile version