एमपीएससी परीक्षेत 883 उमेदवार अनुत्तीर्ण

एमपीएससी परीक्षेत 883 उमेदवार अनुत्तीर्ण

एमपीएससी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतलेल्या वित्त व लेखा सेवा वर्ग 3 परीक्षेत 936 पैकी तब्बल 883 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने परीक्षांर्थींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 9 ऑक्टोबरला जाहीर झालेल्या निकालात भाग एकमधील पेपर क्रमांक दोनमध्ये उमेदवारांना खूपच कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे या पेपरची फेरपडताळणी त्रयस्थ अधिकार्‍यांकडून करून उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी अधिदान व लेखा कार्यालय कर्मचारी संघटनेने राज्य सरकारच्या लेखा व कोषागारे विभागाकडे केली आहे.

आयोगामार्फत वित्त व लेखा सेवा वर्ग-3 परीक्षा 24 ते 27 एप्रिल 2018 या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षेतील भाग एक साठी 936 उमेदवार बसले होते. परंतु त्यातील पेपर क्रमांक 2 या विषयात 883 उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहेत, तर केवळ 53 उमेदवारच उत्तीर्ण झाले.

पेपर क्रमांक 2 मध्येच सर्व उमेदवारांना मिळालेले गुण बरेच कमी असल्याचा दावा, संघटनेने केला आहे. पेपर क्रमांक 2 हा 30 टक्के सैद्धांतिक व 70 टक्के व्यावहारिक स्वरूपाचा असावा, असे स्पष्ट केले आहे. मात्र, पेपर क्रमांक 2 मध्ये 70 सैद्धांतिक व 30 टक्के व्यवहारिक प्रश्न होते. त्यामुळे 70 टक्के पेपर हा पुस्तकांसह लिहायचा असल्यामुळे सर्व उमेदवारांना पेपर क्रमांक 2 मध्ये चांगल्या गुणांची अपेक्षा होती.

मात्र, याच पेपरमध्ये उमेदवारांना कमी गुण मिळाले असल्याने या उमेदवारांवर अन्याय झाला असून त्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याचा आरोप, संघटनेचे उपाध्यक्ष दिपीप कडू यांनी केला आहे. त्यामुळे पेपर क्रमांक 2 मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या पेपर क्रमांक 2 ची पुनर्पडताळणी त्रयस्थ अधिकार्‍यांकडून करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

First Published on: October 12, 2019 6:05 AM
Exit mobile version