पुण्याच्या ९ वर्षीय अद्वैतने केला माउंट किलीमंजारो सर

पुण्याच्या ९ वर्षीय अद्वैतने केला माउंट किलीमंजारो सर

पुण्याच्या ९ वर्षीय अद्वैतने केला माउंट किलीमंजारो सर

वयाच्या ६व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्पचे शिखर सर करणारा अद्वैत भरतिया हा सर्वात कमी वयाचा गिर्यारोहकांपैकी एक भारतीय ठरला होता. आता वयाच्या ९व्या वर्षी माउंट किलीमांजारो सर करून आपल्या कामगिरीत त्याने अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. अद्वैतने आपली आई पायल भरतिया आणि या मोहिमेचे लीडर समीर पथम यांच्या नेतृत्वाखाली मचामे मार्गाने ट्रेक सुरु केला. ३१ जुलै २०१९ रोजी तब्बल १८६५२ फूट उंच वसलेल्या माउंट किलीमंजारोच्या अतिउच्च शिखरावर पोहोचला. माउंट किलीमंजारोच्या गिर्यारोहणात अद्बैतला तेथील स्थितीचा यशस्वी सामना करता यावा यासाठी त्याला दोन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

अद्वैतने केला माउंट किलीमंजारो सर

दरम्यान, या ट्रेकचे आयोजन पुणेस्थित अ‍ॅडव्हेंचर आणि ट्रेकिंग कंपनी अ‍ॅडव्हेंचर पल्सद्वारे करण्यात आले होते. अद्वैतचे प्रशिक्षक समीर पथमने संपूर्ण एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेच्या १२ दिवस आणि यावेळी माउंट किलीमंजारो मोहिमेच्या ७ दिवस मार्गदशन केले. या प्रवासादरम्यान त्यांनी अद्वैतला गिर्यारोहकांच्या गोष्टी, माउंट एव्हरेस्ट सर केलेले दिग्गज, हिमालयाची एती या दंतकथा तसेच रूडयार्ड किप्लिंग आणि रस्कीन बॉन्ड यांच्या कहाण्या सांगून त्याला प्रोत्साहन दिले.

अद्वैत भरतिया

असे होते प्रशिक्षण

माउंट किलीमंजारोच्या गिर्यारोहणात गिर्यारोहकांना तेथील अगदी कमी हवेचा दाब, समुद्रसपाटीवरील ऑक्सिजनच्या तुलनेत ५० टक्के कमी ऑक्सिजन पुरवठा आणि २१ ते उणे २५ डिग्री सेल्सिअस सब झीरो तापमान या समस्यांना सामोरे जावे लागले होते. या परिस्थितीचा अभ्यास करून अद्वैतसाठी दोन महिन्याच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्याच्या रोजच्या दिनचर्येमध्ये एक तास पोहणे. दुसर्‍या तासाला कार्डिओव्हॅस्क्युलर प्रशिक्षण जसे की फुटबॉल, क्रिकेट आणि टेनिस यांसारखे खेळ खेळणे. त्यानंतर तिसर्‍या तासात १०० मजले चढणे तसेच पार्कमध्ये रोज सराव अशा प्रकारचा रोजचा सराव ठरलेला होता. यापूर्वी अद्वैतने त्याच्या आईबरोबर लेह आणि लडाख आणि पुण्याच्या आसपास माउंट किलीमांजारोच्या तयारीसाठी ट्रेक सुद्धा केले आहेत.

अद्बैतला मिळालेले प्रमाणपत्र

सहगिर्यारोहकांनी दिलेल्या टोपण नावाची आठवण

आपला अनुभव सांगताना अद्वैत म्हणाला की, ”ट्रेक आव्हानात्मक असल्यामुळेच करायला मज्जा आली. एव्हरेस्ट बेस कॅम्प शिखर सर करण्याच्या मोहिमेवेळी मी लाकडाच्या घरात राहत होतो. परंतू माउंट किलीमंजारोच्या ट्रेकवेळी आम्ही तंबूमध्ये राहिलो. त्यावेळी आजुबाजूचा परिसर आणि बर्फाचा अनुभव घेण्याची सुंदर संधी मला मिळाली. मी हा ट्रेक अजून लवकर पूर्ण करू शकलो असतो. पण हे शिखर इतके सुंदर होते की मी काही ठिकाणी थोडा वेळ थांबून शिखराचे सौंदर्य न्याहाळत होतो.” असे सांगून अद्वैतने त्याच्या पुढील वाटचालीबद्दलसुद्धा सांगितले. तो म्हणाला, ”आता पुढील वर्षी माउंट एलब्रस चढण्याकरिता मी नियोजन करीत आहे. परंतू सध्याचा वेळ हा शाळेसाठी राखून ठेवला आहे. पुढील प्रवासाकरिता मी खूपच उत्सुक आहे.” यावेळी माउंट किलीमंजारोच्या ट्रेक दरम्यान इतर गिर्यारोहकांनी त्याला ‘सिम्बमटोटो’ म्हणजे ‘लिटील सिम्बा’ असे नाव दिल्याची आठवणसुद्धा त्याने सांगितली.

हेही वाचा – ‘अभिनंदन’ वर्धमान, स्वातंत्र्य दिनी शौर्याला सलाम

अद्वैतच्या आईने दिला आठवणींना उजाळा

अद्वैतच्या माउंट एलब्रस च्या गिर्यारोहणाबद्दल त्याची आई पायल भरतिया यांनीसुद्धा मुलाच्या गिर्यारोहणातील आठवणींना उजाळा दिला. पायल भरतिया म्हणाल्या की, ”सगळ्यात लहान गिर्यारोहक असल्यामुळे या मोहिमेमध्ये सगळ्यांचे त्याच्याकडे लक्ष जात होते. सह गिर्यारोहक त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी खूप उत्सुक होते. कारण त्यांना घरी जाऊन त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना त्याचे फोटो दाखवून प्रोत्साहित करण्याची खूप इच्छा होती. या ट्रेक दरम्यान अद्वैतला आपल्या सहकार्यांकडून बरेच प्रोत्साहन मिळत होते. कारण त्यांनी पहिल्यांदाच इतक्या लहान गिर्यारोहकाला इतक्या उंचीवरील मोहिमेमध्ये सहभागी झालेले त्यांनी पाहिले होते.”

अद्वैत भरतिया आईसोबत

अद्वैतचा अभिमान – पायल भरतिया

यासंबंधी बोलताना अद्वैतची आई पायल भरतिया म्हणाल्या की, माझा प्रवास माउंट किलीमांजारोच्या अंतिम टप्प्याच्या आधी एक हजार फूट इतका कमी करण्यात आला. कारण मला त्या उंचीवर हवामानाशी जुळवून घेणे कठीण जात होते. तरीसुद्धा समीर आणि त्याचे टांझानियन मार्गदर्शक यांच्या सहकार्याने अद्वैतने हा ट्रेक पूर्ण केला. मला अद्वैतच्या हा ट्रेक पूर्ण करण्याच्या चिकाटीबद्दल त्याचा खूप अभिमान वाटत आहे. त्यातच ट्रेकच्या शेवटच्या दिवशी अद्वैत खूप भावनिक झाला होता. यावेळी त्याने सगळ्या टीमचे त्यांच्या सहकार्याबद्दल व्यक्तीगत आभार मानल्याचेही,” पायल भरतिया यांनी सांगितले.

गिर्यारोहक अद्बैतची इतर गुणवैशिष्ट्ये

तो खूप चांगला स्कीअर असून त्याने स्वित्झर्लंडपासून इटलीपर्यंत स्कीईंग केले आहे. तो उत्तम सर्फर आहे. अद्वैत पिआनो, व्हायोलिन, गिटार आणि ड्रम या वाद्ये वाजवण्यात पारंगत असून त्यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवले आहे. तो माद्रीन भाषेत आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवलेला सर्वात लहान भारतीय आहे.

माणूस आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर खूप लहान वयात योग्य मार्गदर्शन, कठीण परिश्रम आणि समर्पण या गोष्टी असतील तर काहीही करू शकतो याचे अद्वैत हा एक उत्तम उदाहरण आहे. या मुलाने प्रचंड धैर्य आणि समजूतदारपणा दाखवत या प्रवासातील कठीण प्रसंगांना पार केले आहे. या मोहिमेची यशस्वी पूर्तता करून अद्वैतने ६व्या वर्षी एव्हेरस्ट बेस कॅम्प आणि ९व्या वर्षी माउंट किलीमंजारो सर करणारा भारतातील सर्वात लहान गिर्यारोहकांपैकी एक ठरला आहे. वयाच्या ९व्या वर्षी मोठे यश अद्वैतने मिळवले आहे.
समीर पथम, मोहिमेचे प्रमुख आणि अ‍ॅडव्हेंचर पल्सचे सहसंस्थापक

 

 

First Published on: August 14, 2019 6:10 PM
Exit mobile version