दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, तपासणीअंती निघाली अफवा

दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, तपासणीअंती निघाली अफवा

नवी दिल्ली : दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाल्याने दिल्ली विमानतळावर घबराट पसरली होती. ही धमकी मिळताच सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानतळावरील आयसोलेशन बे (Isolation Bay) येथे विमानाची तपासणी करण्यात आली. पण विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील यूके-971 या दिल्ली ते पुणे विमानात बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचा फोन सकाळी पावणेआठच्या सुमारास गुरुग्राममधील जीएमआर कॉल सेंटरमध्ये आला. माहिती मिळताच तातडीने कारवाई करत सर्व प्रवाशांसह त्यांचे सामानही विमानातून खाली उतरवण्यात आले. विमानात 100 हून अधिक प्रवासी होते. त्यानंतर तपासणीसाठी राखून ठेवण्यात आलेल्या स्वतंत्र जागी (Isolation Bay) विमान नेऊन त्याची तपासणी करण्यात आली. परंतु त्यात काहीही आढळले नाही. सीआयएसएफ (CISF) आणि दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा – जुहू समुद्रातील खडकांवर ‘शेवाळ’; पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

प्रवाशांना सुखरूपपणे टर्मिनल इमारतीत नेण्यात आले. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार (SOP) सुरक्षा एजन्सी क्लिअरन्स देत नाही तोपर्यंत विमानाचे पुन्हा उड्डाण केले जात नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून अंतिम मंजुरी मिळताच विमान पुण्यासाठी रवाना होईल, असे सूत्रांनी सांगितले.

चार दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात बिघाड

काठमांडूहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान (एआय-216) उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच, तांत्रिक बिघाड झाल्याने ते तसेच थांबविण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे विमान धावपट्टीवरून हटवण्यात आले. ही घटना काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या मंगळवारी (15 ऑगस्ट 2023) पहाटे चारच्या सुमारास घडली. या विमानात 179 प्रवासी होते. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले.

धावपट्टीवरच विमानात बिघाड झाल्याने तासभर पुढील उड्डाणांवर त्याचा विपरित परिणाम झाला. दोन आंतरराष्ट्रीय आणि पाच राष्ट्रीय उड्डाणे आकाशातच रोखण्यात आली होती. ट्रॅक्टरच्या मदतीने विमान धावपट्टीवरून हटवून पार्किंगमध्ये नेल्यानंतर उड्डाणे नियमितपणे सुरू करण्यात आली.

First Published on: August 18, 2023 1:11 PM
Exit mobile version