व्हॅलेंटाइन्स डेला ऑफर्सची धूम ; कॅफे, रेस्टॉरंट्स हाऊसफूल

व्हॅलेंटाइन्स डेला ऑफर्सची धूम ; कॅफे, रेस्टॉरंट्स हाऊसफूल

 नाशिक :
जगभरातली तरुणाई ज्या व्हॅलेंटाइन्स डेची आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस मंगळवारी (दि.१४) साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध ब्रँड्स आणि शोरुम्सने तरुणाईसाठी आकर्षक ऑफर्सदेखील जाहीर केल्या आहेत. तर, दुसरीकडे या डेच्या पूर्वसंध्येला शहरातील कॅफे आणि रेस्टॉरंट्स गर्दीने फुलून गेले होते. बाजारपेठेत गुलाबाच्या फुलांसह भेटवस्तूंच्या खरेदीसाठीही तरुणांचा मोठा उत्साह कायम होता.

प्रेमाचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असते, असे म्हणतात. जगाच्या पाठीवर प्रेमाची व्याख्या एकसारखीच असते. म्हणूनच हा दिवस एकाच भावनेने साजरा होत असते. व्हॅलेंटाइन्स डेच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. फेब्रुवारीत येणारा प्रेमाचा आठवडा गेल्या सात दिवसांपासून विविध डेज्च्या स्वरूपात साजरा करण्यात आला. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसाची वाट पाहत असलेल्या तरुणाईची प्रतीक्षा अखेर संपली. प्रेमीयुगुलांनी व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यासाठी विशेष नियोजनही केले आहे. व्हॅलेंटाइन्स डेच्या पूर्वसंध्येला कॅफे-रेस्टॉरंट्स हाऊसफूल झाल्याचे दिसून आले. भेटवस्तू म्हणून विविध चॉकलेट्सचे प्रकार, भेटकार्ड, टेडीबेअर, पिलो, प्रिंटेड मग याला तरुणाईची पसंती मिळते आहे. हा दिवस केवळ तरुण-तरुणींमध्येच नव्हे तर आई-वडील, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रिणी यांच्यातही साजरा होऊ लागला आहे. ‘व्हॅलेंटाईन्स डे’निमित्त हॉटेल्स, रेस्टॉरंटकडून विविध ऑफर जाहीर करण्यात आल्या आहेत.

यामुळे साजरा केला जातो व्हॅलेंटाईन्स डे’!

१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात रोमचा राजा क्लॉडियस याच्या काळात झाली. त्यावेळी रोममध्ये सेंट व्हॅलेंटाईन नावाचे एक धर्मगुरू होते. त्यांनी सैनिकांचे लग्न लावून दिले. यावर राजा संतप्त झाला व त्याने १४ फेब्रुवारी २६९ रोजी सेंट व्हॅलेंटाइनला फाशी दिली. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘प्रेम दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

हँडमेड चॉकलेटची क्रेझ

यंदाच्या व्हॅलेंटाईन्स डे’ला हँडमेड चॉकलेटला तरुणांकडून अधिक पसंती मिळत आहे. विविध आकाराच्या आकर्षक गिफ्ट बॉक्समध्ये पॅक केलेले चॉकलेट यंदाच्या व्हॅलेंटाईन्स डे’चे लोकप्रिय गिफ्ट ठरत आहे. या चॉकलेटमध्ये ड्रायफ्रूट, व्हेनीला, मँगो, ऑरेंज असे फ्लेवर्स उपलब्ध आहेत.

कोरोनानंतर यंदा प्रथमच तरुणाईने व्हॅलेंटाईन्स डे’ला रेकॉर्डब्रेक खरेदी केली. यंदा युवक हँडमेड चॉकलेट, मिस्टरी गिफ्ट बॉक्सला अधिक पसंती देत आहेत. – चेतन पवार, मॉडर्न गिफ्ट हाऊस

First Published on: February 14, 2023 12:20 PM
Exit mobile version