महाराष्ट्रात एकूण ८६८ करोनाग्रस्त

महाराष्ट्रात एकूण ८६८ करोनाग्रस्त

औरंगाबादमध्ये नव्या ४५ रुग्णांची वाढ; ७३७ रुग्णांवर उपचार सुरु

करोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊनसारख्या उपायांची काटकोरपणे अंमलबजावणी होत असतानाही करोनाग्रस्तांची वाढती संख्या राज्यासाठी चिंताजनक बनली आहे. सोमवारी राज्यात १२० नवीन करोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ८६८ झाली असून सोमवारी राज्यात ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५२ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. तर देशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४०६७ झाली असून आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७५६३ नमुन्यांपैकी १५,८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ६६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३२,५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ८ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीम मधील आहे.

करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती

1) बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका ४१ वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला अतिरिक्त मद्यपानामुळे यकृताचा आजारही होता शिवाय तो अपस्माराचा रुग्ण होता.

2) बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका ६२ वर्षीय पुरुषाचा ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब , डाव्या अंगाचा पॅरालिसिस हे आजारही होते .

3) मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उच्च रक्तदाब असणा-या ८० वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला.

4) नवी मुंबई येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि हृदयरोग हे आजारही होते.

5) मुंबईच्या नायर रुग्णालयात नालासोपारा येथील एका ९ महिन्याच्या गरोदर मातेचा (वय ३० वर्षे) मृत्यू ४ एप्रिलला संध्याकाळी झाला.

6) मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात ४ एप्रिल रोजी संध्याकाळी एका ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या दुस-या आठवडयात त्यांनी राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली होती. त्यांना दोन वर्षापासून मधुमेहाचा आजार होता.

7) महानगरपालिकेच्या बांद्रा येथील भाभा रुग्णालयात आज सकाळी अंबरनाथ येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णाने उत्तर प्रदेश मध्ये प्रवास केला होता आणि त्याला मधुमेहाचाही त्रास होता.

लॉकडाऊन वाढणार आरोग्यमंत्र्यांचे संकेत 
राज्यातील करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात मृतांची संख्या आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आम्ही 2.5 ते 3 टक्के मृतांचा आकडा अपेक्षित करत होतो. मात्र, मृतांचा आकडा 5 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच करोनाचा कहर बघून लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी उठवण्यात येईल, अशी अपेक्षा कोणी बाळगू नये, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: April 7, 2020 6:59 AM
Exit mobile version