‘संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही’, आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

‘संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही’, आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

गेल्या अनेक दिवसांसमोर मशिदींसमोर लावणारे भोंगे मनसैनिकांनी आता थेट शिवसेना भवनासमोरच लावले. मनसैनिकांकडून भोंगा लावून हनुमान चालीसा वाजवण्यात आला. रामनवमीचे औचित्य साधून सेनाभवनाच्या समोर भोंगा लावून मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिल आहे. ‘मी संपलेल्या पक्षाला उत्तर देत नाही’, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मनसेला लगावला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळीमध्ये विंटेज कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मनसेला टोला लगावला. यावेळी शिवसेना भवन मशिद आहे का? असा सवाल विचारला असता आदित्य ठाकरे यांनी “मी संपलेल्या पक्षाला उत्तर देत नाही”, असं म्हटलं. तसंच, ‘स्टंटबाजीला मी भाव देत नाही’, असा टोलाही यावेळी त्यांनी मनसे आणि कार्यकर्त्यांना लगावला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जिथे मशिदींवर भोंगे लावून अजान सुरू असेल तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच घाटकोपर येथे मनसेच्या कार्यालयावर भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले होते. पण पोलिसांनी काही वेळातच मनसेच्या कार्यालयावरील लावण्यात आलेले भोंगे काढून मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर आज रामनवमीच्या निमित्ताने मनसेकडून चक्क शिवसेना भवनासमोरच हनुमान चालीस लावली गेली. एका टॅक्सवजा रथावर भोंगा लावून हनुमान चालीसा लावण्यात आली.

‘आज रामनवमीचा सण आहे. राज ठाकरेंनी आम्हाला सगळे सण मोठ्या प्रमाणात साजरे व्हायला पाहिजेत असे सांगितले आहे. विविध ठिकाणी आज रामनवमीचा उत्सव साजरा होत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा रथ तयार केलेला आहे. ज्या मंडळांकडून किंवा मंदिरांकडून या रथासाठी मागणी होईल, त्या ठिकाणी आम्ही पाठवू. दरम्यान शिवसेनेने हिंदुत्व बासनात गुंडाळून ठेवले आहे. हिंदुत्व सोडून सत्तेसाठी लाचरी पत्करली आहे. त्यांना याची जाग यावी, यासाठी शिवसेना भवनासमोर भोंगा लावला आहे’, असे यशवंत किल्लेदार म्हणाले.


हेही वाचा – महाराष्ट्राचं नशीब असं काही घडलं नाही; पवारांच्या घरावरील हल्ल्यावर आव्हाडांचं मोठं वक्तव्य

First Published on: April 10, 2022 12:41 PM
Exit mobile version