महाविकास आघाडीतील आमदाराची आदित्य ठाकरेंविरोधात मंत्रालयातच घोषणाबाजी

महाविकास आघाडीतील आमदाराची आदित्य ठाकरेंविरोधात मंत्रालयातच घोषणाबाजी

महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षांव्यतिरीक्त इतरही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यापैकीच एक समाजवादी पक्षाचे अबू आझमी देखील आहेत. अबू आझमी यांनी मविआ सरकारला समर्थन दिले होते. मात्र आता त्यांनाच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्याची वेळी आली आहे. अबू आझमी यांनी आज मंत्रालयाच्या गेटवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन केले. एवढेच नाही तर त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी देखील केली. सरकारचा घटक असलेल्या पक्षाला सरकारमधील एखाद्या मंत्र्याविरोधात एवढा आक्रमक पवित्रा घ्यावा लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीने यासंबंधी बातमी दिली आहे.

मानखुर्द येथील SMS कंपनी बंद करण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी अबू आझमी म्हणाले की, “आम्ही ठाकरे सरकारला पाठिंबा दिला आहे. तरिही ते आमचे ऐकत नाहीत. आमची कामे होत नाहीत. एवढेच नाही तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आमचा फोनही घेत नाहीत.” गेल्या अनेक वर्षांपासून अबू आझमी ही कंपनी बंद व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. याआधी असलेले पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या कडेही त्यांनी अनेकदा पाठपुरावा केला होता. त्या बैठकांचा तपशील त्यांनी आपल्या फेसबुकवर टाकला होता.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातील राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडले होते. त्या अधिवेशनातही अबू आझमी यांनी SMS कंपनी बंद करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले होते. गोवंडीच्या देवनार डम्पिग ग्राऊंडजवळ असलेल्या या कंपनीमुळे मानखुर्द आणि गोवंडीच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असून यामुळे १२ लाख लोक प्रभावित होत असल्याचा दावा अबू आझमी यांनी केला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून ही कंपनी बंद करण्यासाठी आझमी प्रयत्नशील आहेत.

First Published on: September 30, 2020 5:13 PM
Exit mobile version