पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल मार्च अखेरपर्यंत बंद

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल मार्च अखेरपर्यंत बंद

महाराष्ट्रात करोना बाधितांचा आकडा आज ४९ वर पोहोचला असून मुंबईतील दोन महिलांना या करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संख्या वाढत असतानच पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये, याकरता पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नॉन – एसी लोकल नेहमीप्रमाणे धावणार आहे. विशेष म्हणजे ही एसी लोकल येत्या मार्च अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

करोनाचे २ रुग्ण व्हेटिंलेटरवर

महाराष्ट्रात सध्या करोनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. दरम्यान, गर्दीमुळे सर्वात जास्त संसर्ग पसरण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. गेल्या १२ तासांत ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. वाढलेली संख्या पाहता संसर्ग पसरुन रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. तर, २ रुग्ण व्हेटिंलेटरवर असून इतरांची प्रकृती स्थिर असल्याचेही टोपेंकडून सांगण्यात आले आहे.

आज पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण

दरम्यान, मुंबईत एका २२ वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली असून ही व्यक्ती इंग्लंडवरुन परतली असल्याची माहिती समोर आली आहे. तर उल्हासनगरमधील एका ४९ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले असून ही व्यक्ती दुबईवरुन आली असल्याची माहिती समोर आली आहे.

तर बुधवारी रत्नागिरीमध्ये पहिला करोना व्हायरसचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. रत्नागिरीतील ५० वर्षांच्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्यासोबतच पुणे, मुंबई, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, कल्याण या ठिकाणी करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहोचली आहे.


First Published on: March 19, 2020 2:46 PM
Exit mobile version