उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उडणार धांदल

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उडणार धांदल

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अखेरचे दोन दिवस शिल्लक असताना उमेदवारी न मिळाल्याने नाराज इच्छुकांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. राजकीय हालचाली गतीमान झाल्या असून गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभतेने पार पडावी, याकरिता प्रशासनही सज्ज झाले आहे. मुंबईमधील ३६, ठाण्यातील १८ आणि नवी मुंबईतील ६ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

मर्यादीत जागा आणि इच्छुकांची भाऊगर्दी यामुळे विविध राजकीय पक्षांनी अद्यापपर्यंत इच्छुकांना ‘वेटिंग’वर ठेवले आहे. उमेदवारी देताना काट्याची टक्कर बघायला मिळत आहे. अशा स्थितीत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरीची तयारी दर्शवली आहे. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली, मात्र पितृपक्ष तसेच जागावाटपाबाबत कोणताही निर्णय न झाल्याने एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही. २९ सप्टेंबरला साप्ताहिक सुटीमुळे शासकीय कार्यालये बंद होती. ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या दोन दिवसांत इच्छुकांनी अर्ज नेले. मात्र, पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात न आल्याने प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करू शकले नाहीत.

उमेदवारी कोणाला मिळणार, केव्हा मिळणार या गोंधळाच्या स्थितीत चार दिवस हातातून निघून गेले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या हाती आता केवळ दोनच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. शुक्रवार, ४ ऑक्टोबर ही नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख असून जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता झुंबड उडणार आहे. काही मतदारसंघांत जागेबाबत अद्याप तोडगा निघू न शकल्याने इतर जागांवरील उमेदवारांना शिवसेना, भाजपने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. मात्र, अद्यापही काही जागांबाबत एकमत होत नसल्याने मुंबईसह, ठाणे आणि नवी मुंबईतही बंडोबांनी पक्षाविरोधात निशाण फडकावले आहे. त्याचे पडसाद येत्या दोन दिवसांत बघायला मिळतील.

दरम्यान ४ आणि ५ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मतदारसंघनिहाय विशेष पोलीस बंदोबस्ताचेही नियोजन असून, निवडणूक विभागही सज्ज आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्यास आल्यापासून ते प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतचे कामकाज सुलभतेने व्हावे याकरिता प्रशासनाचे नियोजन झाले आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर सर्वाधिक इच्छुकांची संख्या असलेल्या भाजप, सेनेची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी डावलल्याच्या कारणावरून भाजप, शिवसेनेसह अन्य सर्व पक्षांच्या इच्छुकांनी आता थेट स्वपक्षालाच आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. आता बंडोबांना थंड करण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर उभे ठाकले आहे.

शक्तिप्रदर्शनाची तयारी
भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर झालेले इच्छुक जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विविध पक्षांचे उमेदवार आमने-सामने येणार असल्याने तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच शक्यता गृहीत धरून कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, त्या दिवसापासूनच मोठा पोलीस फाटा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तैनात आहे. पुढील दोन दिवस अधिक तणावाची स्थिती राहणार असल्याने बंदोबस्त वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

First Published on: October 3, 2019 6:33 AM
Exit mobile version