धावत्या एसटीत तरुणाची हत्या करणारा आरोपी गजाआड

धावत्या एसटीत तरुणाची हत्या करणारा आरोपी गजाआड

(फोटो प्रातिनिधिकआहे)

आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

राजगुरुनगरच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसमध्ये दावडी गावाजवळ मंगळवारी श्रीनाथ खेसे या तरुणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या करणारा क्रूरकर्मा आरोपी अजित कान्हुरकर याला स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलिसांनी संयुक्तरित्या शोध मोहीम काढून अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली.
प्रज्ञा खेसे या तरुणीशी विवाह करण्यासाठी तिच्या घरच्या मंडळीचा विरोध होतो, म्हणून आरोपीने तिचे अश्लील फोटो सोशल मीडियातून व्हायरल केले होते. त्यामुळे मुलीने आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा राग मनात राग धरून आरोपीने मुलीचा भाऊ श्रीनाथ खेसे याचा खून केला.
हा खून झाल्याबरोबर मुलीच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी एसटी बस खेड पोलीस ठाण्यात जबरदस्तीने आणली, तसेच आरोपी जोवर पकडणार नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

जंगलातील ओढ्यात लपलेला आरोपी
खेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन तुकड्या यांनी दावडी गावात शोध सुरू केला. या ठिकाणच्या जंगल परिसरातील एका ओढ्यामध्ये अजित कान्हुरकर हा लपला होता. खेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध घेत आरोपी अजितच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने श्रीनाथ खेसे याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

दोन पोलिसांचे होणार निलंबन
या प्रकरणात आरोपीच्या विरोधात याआधीही प्रज्ञा खेसे हिने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आरोपीला खून करण्याचा वाव मिळाला. त्यावर पुणे ग्रामीणचे पोलीस उप-अधीक्षक सातपुते यांनी या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच ग्रामस्थांनी श्रीनाथचा मृतदेह ताब्यात घेतला.

First Published on: June 14, 2018 6:07 AM
Exit mobile version