देशमुखांवरील कारवाई राजकीय हेतूने आणि लोकशाहीला घातक; नवाब मलिक, सचिन सावंत यांची टीका

देशमुखांवरील कारवाई राजकीय हेतूने आणि लोकशाहीला घातक; नवाब मलिक, सचिन सावंत यांची टीका

देशमुखांवरील कारवाई राजकीय हेतूने आणि लोकशाहीला घातक; नवाब मलिक, सचिन सावंत यांची टीका

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कारवाईवर टीका केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला हे सगळं राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे अशी नवाब मलिक यांनी यांनी व्यक्त केली आहे. तर अनिल देशमुख यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक असल्याची खरमरीत टीका सावंत यांनी केली.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणात न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. हे सगळं त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. केंद्रातील भाजप सरकार सर्व केंद्रीय एजन्सींचा वापर करून राजकारण करतेय हे स्पष्ट आहे. त्याचपध्दतीने ईडीने गुन्हा दाखल केला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

हा गुन्हा राजकीय हेतूने आणि आघाडी सरकारला, पक्षाला बदनाम करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ज्या काही कायदेशीर बाबी असतील त्या तपासाला अनिल देशमुख सहकार्य करतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

देशमुखांवरील कारवाई मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतिक

अनिल देशमुख यांच्यावर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे, असं सचिन सावंत म्हणाले.

परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला? असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी दिली.

First Published on: May 11, 2021 1:50 PM
Exit mobile version