मराठी पुस्तकात गुजराती धडा छापणाऱ्या मुद्रकावर कारवाई होणार

मराठी पुस्तकात गुजराती धडा छापणाऱ्या मुद्रकावर कारवाई होणार

मराठी भुगोलाच्या पुस्तकात गुजराती धडे

मराठी माध्यमाच्या सहावीच्या भुगोल पुस्तकातील गुजराती धडे छापणाऱ्या अहमदाबादमधील मुद्रकावर कारवाई होणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा एकदा उपस्थित करुन त्या मुद्रकावर कारवाई करण्याची मागणी केली. शुक्रवारी आमदार सुनिल तटकरे यांनी औचित्याच्या मुद्दयाखाली हा प्रश्न उपस्थित करुन सरकारला कोंडीत पकडले होते. याच प्रश्नावरुन शुक्रवारी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करावे लागले होते.

मुद्रकाकडून या पुस्तकाची बांधणी करताना मराठी भूगोलाच्या पुस्तकामध्ये गुजराती पुस्तकाची पृष्ठे लागली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मुद्रणालयाकडून झालेल्या चुकीबाबत खुलासा मागविण्यात येत आहे. पुस्तकामध्ये सदोष बांधणी करणाऱ्या मुद्रणालयावर कारवाई करण्याची तरतुद निविदेच्या अटी व शर्तीमध्ये आहे. अहमदाबादमधील श्लोक प्रिंट सिटी या मुद्रणालयावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

… तर मी आत्महत्या करेन – तटकरे

दरम्यान शुक्रवारी सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांनी हे पुस्तक छापून आणले असेल, अशी शंका व्यक्त केली होती. त्यावेळी आमदार सुनिल तटकरे यांनी मी माझ्या ३०-३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा प्रकार कधी केला नाही आणि तसे वाटत असेल तर सभागृहात विष पिवून आत्महत्या करेन, असे भावनिक वक्तव्य केले होते. त्यामुळे सभागृहामध्ये गोंधळ होत कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. त्या वक्तव्यावर आज सभागृहनेते चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त केली.

मराठी माध्यमाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडे

First Published on: July 16, 2018 6:30 PM
Exit mobile version