करोना रुग्ण व कुटुंबियांवर बहिष्कार टाकल्यास होणार कारवाई

करोना रुग्ण व कुटुंबियांवर बहिष्कार टाकल्यास होणार कारवाई

करोना व्हायरस

पुण्यातील संशयित करोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांशी कोणी भेदभाव, दुजाभाव किंवा त्या रुग्णावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. करोनासंदर्भातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली.

दुजाभावाची वागणूक दिल्याच्या तक्रारी दाखल

करोनाचे रुग्ण आढळून आल्याने सगळीकडे भीती पसरली आहे. करोनाग्रस्त रुग्णांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुजाभावाची वागणूक देत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रुग्णासोबत त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीयांशी कुणी दुजाभाव, भेदभाव किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकला तर, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्यावरही कारवाई

तसेच संबंधित सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांनाही जबाबदार धरण्यात येईल. अशा परिस्थितीत कारवाई करणे अपेक्षित नाही. पण तुम्हीही सहकार्य करा. रुग्ण किंवा कुटुंबीयांना चांगली वागणूक द्या. याबाबत तुम्हीही लोकांना सांगा. सोसायट्यांमध्ये कुणीही रुग्णाविषयी किंवा कुटुंबीयांबद्दल टिप्पणी करू नये, त्यावर आमचे लक्ष राहील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात काही भागात १४४ लागू करण्याचा विचार

शहरात काही भागात कलम १४४ लागू करण्याचा विचार असून लवकरच आदेश काढणार आहे. शहरात जमावबंदीचे परिसर संध्याकाळपर्यंत जाहीर केले जातील. शहरातील भाजीपाला, औषध दुकाने आणि मॉलमधील दैनंदिन खाद्यवस्तूंची विक्री सुरू राहील. ती बंद होणार नाही. एमपीएससी परीक्षांबाबत लवकरच एमपीएससीकडून वेळापत्रकातील बदल जाहीर केली जातील. संबंधित विद्यार्थ्यांनी ते वेळापत्रक पाहावे. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनीही विनाकारण बाहेर फिरू नये. कोणीही गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करू नये. मला मोबाईलवरून चुकीची माहिती दिलेल्या एकाविरुद्ध मी स्वतः एफआयआर दाखल केला आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

First Published on: March 15, 2020 7:37 PM
Exit mobile version