अभिनेता अक्षय कुमारचा नाशिक दौरा वादात..

अभिनेता अक्षय कुमारचा नाशिक दौरा वादात..

Actor Akshay Kumar's Nashik tour in controversy ..

प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांनी तीन दिवसांपूर्वी केलेला नाशिक दौरा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. मार्शल आर्ट अकॅडमी अथवा निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याबाबत अक्षय कुमार यांनी नाशिक येथे भेट देत माहिती घेतली. या दौर्‍या दरम्यान ते त्र्यंबक येथील एका रिसोर्टमध्ये मुक्कामीदेखील होते. मात्र, आता अक्षय कुमार यांचा हा दौरा वादात सापडणार आहे. कोरोना संकटकाळात हॉटेल, रिसोर्टस तसेच जिल्हा सीमाबंदी असताना आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री चारचाकीने दौरे करत असताना अक्षय कुमार यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी कशी दिली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या दौर्‍याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


अक्षय कुमार खासगी हेलिकॉप्टरने नाशिकला आले होते. येथील सपकाळ नॉलेज हबच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन झाले. या दौर्‍यादरम्यान ते परिसरातीलच एका खासगी रिसोर्टमध्ये मुक्कामीदेखील थांबले होते. विशेष म्हणजे, नाशिक पोलीसही त्यांच्या दिमतीला असल्याचे या दौर्‍याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून दिसून येते. सध्या कोरोनाचे संकट घोंगावत असताना सर्वसामान्यांना एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. कोरोनाच्या या महामारीशी मुकाबला करताना राज्याचे मुख्यमंत्री ते सर्व मंत्री कारने संपूर्ण राज्याचा दौरा करत असताना अभिनेते अक्षय कुमार यांना व्हीआयपी ट्रिटमेंट का व कशासाठी देण्यात आली असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, राज्यात हॉटेल, रिर्सोट यांना परवानगी देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी इगतपुरी येथील रिसोर्ट चालकावर कारवाई करण्यात आली असताना अक्षय कुमार यांच्यासाठी रिसोर्ट कसे खुले करण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहेत.
याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारणा केली असता याप्रकरणी प्रशासनाला चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अक्षय कुमार नाशिकमध्ये येऊन काही करत असतील तर निश्चित त्याचे स्वागत करू, परंतु कोरोनाच्या या संकटकाळात हा दौरा कसा आयोजित केला गेला, यास परवानगी कोणी दिली, याची सखोल चौकशी करून यात जर काही चुकीचे अथवा नियम डावलल्याचे आढळल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

प्रशासन अनभिज्ञ

महत्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर लॅण्डिंगची परवानगी जिल्हा प्रशासनामार्फत दिली जाते. मग ही परवानगी कोणी दिली, याबाबत प्रशासनाच्या काही अधिकार्‍यांना विचारणा केली असता आपणांस याबाबत काहीही माहीती नसल्याचे सांगण्यात आले. तर अक्षय कुमार हे ज्या भागात आले होते, तो भाग ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येतो, मग शहर पोलीसांचा ताफा तेथे का.. असे अनेक प्रश्नही पुढे येत आहेत. याबाबत पोलिसांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत, त्यामुळे आता याची जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्न उपस्थित केला आहे.

First Published on: July 4, 2020 1:25 PM
Exit mobile version