मुंबईत अजून एका रेल्वे टर्मिनसची भर, ‘या’ स्थानकावरही एक्स्प्रेसला मिळणार रेड सिग्नल

मुंबईत अजून एका रेल्वे टर्मिनसची भर, ‘या’ स्थानकावरही एक्स्प्रेसला मिळणार रेड सिग्नल

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईत अजून एका रेल्वे टर्मिनसची भर होणार आहे. आतापर्यंत मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर पाच रेल्वे टर्मिनस आहेत. परंतु त्यामध्ये आता अजून एका रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेसला रेड सिग्नल मिळणार आहे. बहुचर्चित जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसच्या कामाचा नारळ अखेर फुटला आहे. पश्चिम रेल्वेवरील चौथ्या आणि सहाव्या रेल्वे टर्मिनसच्या उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेने कंत्राटदार नियुक्त केला आहे. त्यामुळे आता उपनगरी प्रवाशांना चालतच टर्मिनस गाठता येणे शक्य होणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील राम मंदीर रेल्वे स्थानक आणि जोगेश्वरी यांच्यातील अंतर सुमारे ५०० मीटर आहे. राम मंदिराच्या विरार दिशेकडील पादचारी पुलाच्या उतरणीच्या पायऱ्यांची जोडणी जोगेश्वरी टर्मिनसला देण्यात येणार आहे. लोकलने येणाऱ्या प्रवाशांना रिक्षा-टॅक्सीशिवाय टर्मिनसमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे.

२४ डब्यांच्या रेल्वे गाड्या चालवण्यासाठी सक्षम ठरू शकतील, असे फलाट नव्या टर्मिनसमध्ये उभारण्यात येतील. एक मार्गिका रेल्वेगाड्या उभ्या करण्यासाठी आणि दोन मार्गिका रेल्वे वाहतुकीसाठी असतील. होम फलाटावर स्थानक इमारत असणार आहे. टर्मिनस परिसरात सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था सुलभ व्हावी यासाठी वाहनांसाठी विशेष व्यवस्था आहे.

जोगेश्वरी टर्मिनस उभारणीमध्ये १३ कंत्राटदारांचा सहभाग आहे. तांत्रिक-आर्थिक छाननीअंती गिरीराज सिव्हिल कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे. टर्मिनस बांधकाम आणि विद्युतीकरण अशा दोन टप्प्यांत टर्मिनसची उभारणी होणार आहे. जून, २०२४ पर्यंत टर्मिनस रेल्वे वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे. टर्मिनस उभारण्यासाठी ७६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी दिली.

मुंबईतील सध्याचे टर्मिनस

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

– लोकमान्य टिळक टर्मिनस

– मुंबई सेंट्रल टर्मिनस

– वांद्रे टर्मिनस

– दादर टर्मिनस

भारतीय रेल्वेवर मेक इन इंडियाच्या धर्तीवर ८ आणि १६ डब्यांच्या वंदे भारत गाड्या धावत असून, शयनयान वंदे भारत चालवण्याचेही नियोजन आहे. या गाड्यांची वाहतूक आणि त्या उभ्या करण्यासाठी नव्या जोगेश्वरी टर्मिनसमध्ये व्यवस्था असणार आहे.


हेही वाचा : एकदा त्रास द्यायचा म्हटलं की…, जयंत पाटील ED चौकशीवरून ठाकरे गटाचे टीकास्त्र


 

First Published on: May 24, 2023 9:13 AM
Exit mobile version