गेले ते गेले…पण हा भगवा इथे असाच फडकत राहणार; आदित्य ठाकरेंचा विश्वास

गेले ते गेले…पण हा भगवा इथे असाच फडकत राहणार; आदित्य ठाकरेंचा विश्वास

नाशिकः युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मनमाड येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांच्या बंडाळीवर खंत व्यक्त करत गेले ते गेले…पण हा भगवा इथे असाच फडकत राहणार, अशी डरकाळी फोडली. यावेळी शिवसैनिकांनी देखील आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रतिसाद दिला. तसंच विरोधी पक्ष संपवण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही, पण आमच्या जवळचे लोक आम्हाला संपवू पाहत होते, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांचा कालपासून हा उत्साह पाहतोय. गेले ते गेले, पण हा भगवा असाच इथे कायम फडकत राहणार आहे. यात्रा करतोय ते तुमचं प्रेम आणि आशीर्वाद घेण्यासाठी फिरतोय. इथे येताना विचार करत होतो, काय घडलं असेल ज्या मुळे गद्दारी झाली. अडीच वर्षात सरकार म्हणून चांगलं काम चाललं होतं. देशभरात जगभरात उद्धव साहेबांच कौतुक होत होतं. मुख्यमंत्री चांगलं काम करत असेल, चांगला माणूस हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला खुर्चीवरून उतरवण्याच मानस का असेल? या ४० जणांना का वाटलं? यांच्यासाठी आपण काय नाही केलं? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.

इथे आल्यावर काळा रामाचा आशीर्वाद घेतला. प्राण जाये पर वचन न जाय हे आपण करत आलोय, हे आपलं सुरू होतं आहे. मुख्यमंत्री असताना ३०० कोटी उद्धव साहेबांनी मंजूर केले. गद्दारांना उत्तर द्यायला आपण बांधील नाही आहोत. एकदा खोटं बोलले फसवत राहिले, की तेच करत राहतात. लोकांनी गदारांच्या या फसवणुकीला ओळखून घ्यावं. नाशिकसाठी केलेली काम लोकांना सांगेन, पण गद्दाराना सांगण्यासाठी मी बांधील नाही. उद्धव साहेबांनी आजोबांनी मला संस्कार शिकवलेत, चांगलं काम करत रहायचं, वाईट काही करायचं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. आताचं सरकार हे बेकायदेशीर आहे, गद्दारांचे सरकार आहे, आज ज्या चेहऱ्याने मी फिरतोय, पण ते ४० लोक असे फिरू शकत नाही. गुवाहाटीत पूर आला होता, तिकडे बंडखोरी करत गेले. गुंडगिरी सोडा, लोक तुम्हाला डोक्यावर घेतील हे यांना सांगत आलो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हतं, यांच्यासाठी काय कमी केलं, सगळं यांचं ऐकत होतो, सगळं काही दिलं, आमचं काय चुकलं याचा विचार करतोय. आम्ही राजकारण करू शकलो नाही, त्यामुळेच यांनी असं केलं. आमचं चुकलंच आम्ही राजकारण करू शकलो नाही आम्ही फक्त समाज कारण करत राहिलो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आपण काम करत राहिलो, आमदार, खासदारांकडे लक्ष दिलं नाही, असं काही ते करतील याचा विचारही केला नाही. राजकारणाची प्रत्येक पातळी आपण सोडत चाललोय. महाराष्ट्रात चुकीचं राजकारण सुरू आहे, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. हे गद्दार सगळीकडे हिम्मत दाखवत फिरतायत, मग अडीच वर्षे मांडीला मांडी लावून का बसले होते? तेव्हा का गप्प बसलात? उद्धव साहेबांची शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हा हे यांचं हे सगळं सुरू होतं. उद्धव साहेबांनी काम सोडलं नव्हतं, काम सुरूच होतं, पण भेटता येत नव्हतं हे खरं आहे. ४० गद्दारांना कळलं उद्धव साहेबांवर शस्त्रक्रिया झाली आहे, तेव्हा यांनी गद्दारी केली, आमदारांची जमवा जमाव करत होते. गद्दारी करायला महाराष्ट्रात हिम्मत नव्हती, गद्दारी करायला सुरुत, गुवाहाटी, गोव्यात गेले. आसाम मध्ये पूर आला होता, तिथे या गद्दारांची मजा सुरू होती. ही गद्दारी राजकारणाशी, किंवा उद्धव साहेबांशी नाही झाली, ही माणुसकीशी गद्दारी झाली, असं आदित्य ठाकरे म्हणाले.


हेही वाचाः गद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी, आदित्य ठाकरेंचा घणाघात

First Published on: July 22, 2022 2:03 PM
Exit mobile version