ठाणे खाडी क्षेत्राला मान्यता मिळाल्यास राज्यातील हे तिसरे रामसर क्षेत्र असेल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

ठाणे खाडी क्षेत्राला मान्यता मिळाल्यास राज्यातील हे तिसरे रामसर क्षेत्र असेल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

ठाणे खाडी परिसरात जैवविविधता असल्याने या परिसरास आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे दिली.

आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य वेटलँड प्राधिकरणाची चौथी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

ठाणे खाडीच्या ६५ चौरस किलोमीटरच्या परिसरात १७ चौरस किलोमीटर अभयारण्य असून उर्वरित जागेत परिसंस्था (इकोसिस्टीम) असल्याने या क्षेत्रात इतर नवीन बंधने येणार नाहीत. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे. देशात एकूण ४६ रामसर क्षेत्र आहेत. राज्यात यापूर्वी लोणार सरोवर आणि नांदूर मध्यमेश्वर या दोन क्षेत्रांना रामसर म्हणून मान्यता मिळाली असून ठाणे खाडी क्षेत्राला मान्यता मिळाल्यास राज्यातील हे तिसरे रामसर क्षेत्र असेल., असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वनविभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.


हेही वाचा: भाजपाचे खासदार शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेत, शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला


 

First Published on: December 10, 2021 10:11 AM
Exit mobile version