‘कमळाबाई’ म्हणून शिवसेनेने हिणवताच, ‘पेंग्विन सेना म्हणायचे का?’ भाजपाचा सवाल

‘कमळाबाई’ म्हणून शिवसेनेने हिणवताच, ‘पेंग्विन सेना म्हणायचे का?’ भाजपाचा सवाल

मुंबई – “झारखंड, दिल्लीमध्ये ऑपरेशन लोटसचा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थात कमळाबाईची वाईट नजर आता काँग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा गेत महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची हातघाई भाजपकडून सुरू आहे,” अशी टीका शिवसेनेने सामनातून भाजपावर केली आहे. यावरून भाजपा मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं असून तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायाचे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – खरी शिवसेना कोणाची हे निवडणूक झाल्यावर कळेलच, अजित पवारांनी शिंदे गटाला सुनावले

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून “कमळाबाई आता ‘हात’घाईवर” असा मथळा देऊन भाजपावर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे ‘कमळाबाई’ या शब्दावरून आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केली. आशिष शेलारांनी ट्विटरद्वारे सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सवाल केला आहे.

“आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचे का? ता.क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत!” असं ट्विट आशिष शेलारांनी केलं आहे.


महाराष्ट्रातील काँग्रेसचा एक बडा नेता भाजपाच्या संपर्कात असून येत्या काही दिवसांत हा नेता आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे काही आमदार आणि मंत्रीही भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, असं सामनाच्या बातमीत लिहिण्यात आले आहे.

First Published on: September 3, 2022 12:20 PM
Exit mobile version