ॲड. सतीश उकेंना ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी, मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश

ॲड. सतीश उकेंना ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी, मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश

नागपूरचे सुप्रसिद्ध वकील सतीश उके यांना ईडीच्या विशेष कोर्टाकडून ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या कोर्टानं सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना सहा दिवसाची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. PMLA अंतर्गत ईडीने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, सहा दिवसांसाठी त्यांना ताब्यात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.

जमीन व्यवहार प्रकरणात सतीश उके आणि प्रदीप उके यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. विविध प्रकरणात आरोपीची कोठडी मिळून तपासाची गरज असल्याचा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला. न्यायालयाने तो मान्य करत सहा एप्रिलपर्यंत उकेंना ईडी कोठडी सुनावली आहे.

सतीश उके यांच्या नागपुर येथील पार्वती येथील घरी ईडीच्या टीमने गुरूवारी सकाळी छापेमारी केली. याठिकाणी अनेक दस्तावेज जमा करण्यात आले. छापेमारीत नेमक्या कोणत्या गोष्टी सापडल्या आहेत, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मुंबईतील काही जमीन खरेदी व्यवहाराशी संबंधित ही चौकशी करण्यात येत आहे. सतीश उके यांची कॉंग्रेसच्या काही नेत्यांच्या जवळची व्यक्ती म्हणून ओळख आहे. त्यामुळेच आगामी काळात हे कॉंग्रेस नेतेही ईडीच्या रडारवर येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र – नाना पटोले

सतिश उके यांना ईडीने अटक केल्यानंतर नाना पटोले यांच्या वकिलाला अटक असा अपप्रचार केला जात आहे. राज्यात काँग्रेस पक्षाचं समर्थन वाढत असल्याने जाणीवपूर्वक माझी आणि काँग्रेस पक्षाची बदनामी केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

कोण आहेत सतीश उके?

ॲड. सतीश उके हे नागपुरचे हायप्रोफाईल वकील आहेत. त्यांनी अनेक वेळा उच्च न्यायालयात पीआयएल दाखल केल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तेव्हापासून उके हे सतत चर्चेत आहेत.

उके यांनी फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने देखील केस लढवली होती. त्यांचे राज्यातील अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. उके यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांच्याशी नागपुरात तीन वेळा त्यांची भेट झाली होती. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात देखील त्यांनी भूमिका घेतली होती.


हेही वाचा : सतिश उकेंच्या आडून मला आणि काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र – नाना पटोले


 

First Published on: April 1, 2022 7:26 PM
Exit mobile version