‘नाणार कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच…’, सामनातल्या जाहीरातीमुळं कोकणात संभ्रम

‘नाणार कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच…’,  सामनातल्या जाहीरातीमुळं कोकणात संभ्रम

सामना दैनिकात नाणारची जाहीरात

‘नाणार जाणार’, असे निवडणुकीपुर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. लोकसभा आणि विधानसभेला नाणार प्रकल्प मागे घेण्याच्या अटीवरुनच शिवसेनेने भाजपशी युती केली होती. तसेच नाणारवासियांच्या आंदोलनाला देखील सेनेच्या स्थानिक नेत्यांनी वेळोवेळी पाठिंबा दिला होता. मात्र उद्धव ठाकरे सरकारला १०० दिवस होत असतानाच दै. सामनामध्ये नाणारची वाहव्वा करणारी जाहीरात पहिल्या पानावर छापून आली आहे. ‘नाणार कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच…’, असे जाहीरातीचे शीर्षक असून सामनाच्या रत्नागिरी आवृत्तीमध्ये ही जाहीरात छापून आल्यानंतर कोकणवासियांमध्ये शिवसेनेच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

सामना दैनिकाच्या कोकण आवृत्तीमध्ये रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहीरात छापून आली आहे. शिवसेनेने सुरुवातीपासून या प्रकल्पाला विरोध केला होता. शिवसेनेच्या निवडणुकीच्या वचननाम्यात देखील प्रकल्प मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता प्रकल्पाची टीमकी मिरवणारी जाहीरात खुद्द सामनामध्येच आल्यानतंर कोकणातील जनता संभ्रमावस्थेत आहे.

जाहीरातीमध्ये काय आहे?

कोकणाचा विकास करण्यासाठी हा प्रकल्प कसा आवश्यक आहे? हे या जाहीरातीमधून दर्शवण्यात आले आहे. प्रकल्पामुळे कोकणातील दीड लाख लोकांना रोजगार आणि २० हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. रोजगार आणि शैक्षणिक सुविधांसोबतच ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल, कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच…’ अशी टॅगलाईन सुद्धा जाहीरातीमध्ये छापन्यात आली आहे.

जाहीरातीचा सरकारशी संबंध नाही – राऊत

सामना दैनिकात नाणार रिफायनरी बाबत पहिल्या पानावर जाहीरात आलेली आहे. खासदार विनायक राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र असले तरी ते वर्तमानपत्र आहे, त्यामुळे त्यांनी कोणत्या जाहीरात्या घ्याव्यात हा त्यांचा अधिकार आहे. मात्र सरकारन म्हणून आम्ही प्रकल्पाच्या विरोधात आहोत. जोपर्यत नाणारची स्थानिक जनता प्रकल्पाच्या समर्थनार्थ उतरत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प होणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

First Published on: February 15, 2020 1:58 PM
Exit mobile version