शिवसेनेच्या ऑफरनंतरही संभाजीराजे अपक्ष उमेदवारीवर ठाम?

शिवसेनेच्या ऑफरनंतरही संभाजीराजे अपक्ष उमेदवारीवर ठाम?

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत आहे. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. सर्व राजकीय पक्षांकडे त्यांनी पाठींब्यासाठी आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिसाद देत पाठींबा दिला आहे. मात्र, शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची आणि राज्यसभा उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या ऑफरनंतरही संभाजीराजे छत्रपती अपक्ष निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत, अशी माहिती मिळत आहे.

शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेने संभाजीराजेंना राज्यसभेसाठी ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शनिवारी संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. त्या बैठकीत संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, त्यानंतर पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी अट घातल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करत आपण राज्यसभेसाठी अपक्ष उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन राज्यसभेवर पाठवावे, असे आवाहन केले आहे. मात्र, शिवसेना सहाव्या जागेवर उमेदवार देणार असल्याचे मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संभाजीराजेंच्या दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याच्या वाटेत अडचण निर्माण झाली आहे.

First Published on: May 18, 2022 9:37 PM
Exit mobile version