निकालानंतर राज्यात आघाडीचे सरकार येईल

निकालानंतर राज्यात आघाडीचे सरकार येईल

बाळासाहेब थोरात यांनी ही थोपटले दंड

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपाकडून २२० जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असतानाच काँग्रेसने देखील या निवडणुकीसाठी आपण सज्ज असल्याचा प्रतिदावा शनिवारी केला आहे. गेल्या पाच वर्षाच्या भाजप शिवसेना सरकारच्या काळात प्रगत महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांच्या विरोधात राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड असंतोष असल्याने या निवडणुकीत राज्यात परिवर्तन होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा प्रतिदावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी सज्ज असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे जागावाटप जवळजवळ पूर्ण झाले आहे. भाजप शिवसेना सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. या सरकारच्या काळात राज्याच्या इतिहासात सर्वात जास्त म्हणजेच १७ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मोठा गाजावाजा केलेली कर्जमाफी योजना फसलेली आहे. ८९ लाखांपैकी ५० टक्के शेतक-यांनाही कर्जमाफी मिळालेली नाही. शेतक-यांच्या मालाला हमीभाव नाही. पीक विमा मिळत नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आर्थिक मंदीमुळे उद्योग क्षेत्र अडचणीत आले आहे.

राज्यातील दुष्काळ आणि पूर हाताळणीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारकडे आर्थिक नियोजन नसल्याने राज्यावरील कर्जाच्या बोज्यात गेल्या पाच वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. हे मुद्दे आघाडी जनतेपर्यंत पोहोचवणार असून जनतेला भेडसावणा-या या ज्वलंत प्रश्नांवरच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. राज्यातील जनता या निवडणुकीत मस्तवाल भाजप शिवसेनेचा पराभव करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला विजय करेल व निवडणूक निकालानंतर राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

First Published on: September 22, 2019 5:46 AM
Exit mobile version