डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबर दरम्यान आगरी महोत्सव

डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबर दरम्यान आगरी महोत्सव

३० नोव्हेंबरपासून भव्य आग्री-कोळी महोत्सव

डोंबिवली : पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला कि डोंबिवलीकरांना विविध उत्सव – महोत्सवाचे वेध लागतात. त्यातच आगरी युथ फोरम आयोजित आगरी महोत्सव कधी होणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. यंदा १२ ते १९ डिसेंबर २०२२ दरम्यान १८ व्या आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे आगरी महोत्सव साजरा करता आला नव्हता. यंदा मात्र मोठ्या दिमाखात आणि उत्साहात हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आगरी समाज हा शेतीनिष्ठ व कष्टकरी समाज आहे. पूर्वीच्या काळी बारा बलुतेदार पद्धत होती. धान्याच्या बदल्यात वस्तू किंवा सेवा दिली जात होती. आजच्या पीढील ती पद्धत माहिती असावी म्हणून या महोत्सवात आपल्या पूर्वीच्या सामाजिक जीवन पद्धती व संस्कृती चित्ररूपाने साकारण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे आगरी समाजाचे नेते कै.दि.बा. पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखविणारा एक विशेष स्टोल या महोत्सवात ठेवण्यात येणार आहे. तसेच आठ दिवस हा महोत्सव चालणार आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने नागरिक या महोत्सवात सहभागी होत असतात. राजातील मंत्री, प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधी व सेलिब्रेटी मंडळी या महोत्सवाला आवर्जून भेट देत असतात. अशा  या महोत्सवाची संपूर्ण जबाबदारी व व्यवस्थापन महिला वर्गाकडे सोपवून त्यांचा आगळा वेगळा सन्मान केला जाणार आहे. हेच या महोत्सवाचे यंदाचे वेगळे वैशिष्ट्य असल्याचे गुलाब वझे यांनी सांगितले.

या महोत्सवात खास महिलांसाठी यशस्वी व आनंदी जीवनाची सूत्रे या विषयावर आदर्श कॉलेजच्या प्राचार्या डॉ. संगीता पांडे यांच्याशी सुसंवाद साधण्यात येणार आहे. मराठी भाषा व मराठी शाळा वाचवा या विषयावरील परिसंवादामध्ये मराठी साहित्य परिषद पुणे कार्यवाह प्रकाश पायगुडे व आमदार बाळाराम पाटील सहभाग घेणार आहेत. भूमिपुत्रांचे भवितव्य या विषयावरील परिसंवादामध्ये  केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, दशरथ पाटील हे सहभागी होणार आहेत. तसेच चला तरुणांनो उद्योजक बनुया या विषयावर प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. याशिवाय ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील सुमारे २ हजार कलाकार आपली कला विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखविणार आहेत. या महोत्सवात एकूण १२० स्टोल असणार असून त्यामध्ये ३५ स्टोल हे आगरी कोळी खाद्यसंस्कृती जपणारे आहेत. याशिवाय मुलांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणे व इतर खेळणी यांची देखील व्यवस्था असल्याने हा महोत्सव आबाल वृद्धांसाठी एक नवीन पर्वणी घेवून येणारा ठरणार आहे.

First Published on: December 4, 2022 7:18 PM
Exit mobile version