अहमगनगरचा महापौर भाजपचाच; बाळासाहेब वाकळे विजयी

अहमगनगरचा महापौर भाजपचाच; बाळासाहेब वाकळे विजयी

अहमदनगर महापालिका निवडणूक २०१८

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे बाळासाहेब वाकळे यांनी अखेर बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपकडे महापौरपद चालून आले. बाळासाहेब वाकळे यांनी ३७ मतांनी विजय मिळवला. अहमदनगर मनपामध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष होता, मात्र शिवसेनेने बहिष्कार टाकल्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी सोपी गेली. महापौरपदाच्या शर्यतीमध्ये शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संपत बारस्कर उभे होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपत बारस्कर यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे भाजपचा मार्ग सुकर झाला.

भाजपचे संख्याबळ असूनही गोवा पॅटर्न राबवत भाजपने अहमदनगर महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे. भाजपचे १४, राष्ट्रवादी काँग्रेसचे १८, बसपा ४ आणि एका अपक्ष उमेदवाराच्या पाठिंब्यावर भाजपने ३७ मतांनी विजय मिळवला.

गिरीश महाजन मॅन ऑफ द सिरीज

भाजपने देशभरात तीन राज्ये गमावली असली तरी महाराष्ट्रात मात्र भाजपला महानगरपालिकांमध्ये चांगले यश मिळत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी जलसंपदा मंती गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली होती. विरोध पत्करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्याकडे धुळे आणि त्यानंतर अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीची सुत्रे दिली होती. महाजन यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून दिले आहे.

याच महिन्यात १० डिसेंबरला अहमदनगरची निवडणूक पार पडली होती. ६८ जागांच्या या महापालिकेत बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता होती. मात्र एकाही पक्षाला बहुमत मिळवता आले नाही. शिवसेना २४, राष्ट्रवादी काँग्रेस १८, भाजप १४, बसपा ४, सपा १ आणि अपक्ष २ उमेदवार निवडूण आले होते.

 

First Published on: December 28, 2018 12:07 PM
Exit mobile version