अहमदनगरमध्ये साखर कारखान्याला भीषण आग; अनेक कामगार अडकल्याची भीती

अहमदनगरमध्ये साखर कारखान्याला भीषण आग; अनेक कामगार अडकल्याची भीती

 

अहमदनगरः अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील गंगामाई कारखान्यात भीषण स्फोट झाल्याचे वृत्त आहे. येथील इथेनॉलच्या टाकीला आग लागल्याने हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटाचे जोरजोरात आवाज होत होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचाव कार्य सुरु आहे. कारखान्यात ८० हून अधिकजण अडकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कारखान्यात झालेल्या स्फोटात जिवित हानी झाल्याची माहिती नाही. अहमदनगर,औरंगाबाद,शेवगाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. संपूर्ण कारखान्यात आगीचे लोट पसरले आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. कारखान्यापासून पाच किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. येथे बघ्यांची गर्दी झाली आहे. पोलीस गर्दीला दूर करण्याचे प्रयत्न करत आहेत. साखर कारखान्यात अडकलेल्या कामगारांच्या नातलगांनी आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे. नातलगांचा आक्रोश कारखान्याबाहेर सुरु आहे. आमच्या माणसांना वाचवा असा टाहो नातलग फोडत आहेत. येथे सद्या गोंधळाचे वातावरण आहे.

कारखान्यात १५० कामगार काम करत होते.आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आगीमुळे आकाशात धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले होते.आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मृत्यू संख्या नाही आणि मृत्यूचा आकडा देखील इतका मोठा असेल असं वाटत नाही, अशी माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

रात्री साडेआठच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ याची माहिती पोलीस व अग्निशमन दलाला दिली. पोलीस व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आसपासच्या परिसरातील स्थानिक नागरिकही बचाव कार्यासाठी पुढे आले आहेत.

First Published on: February 25, 2023 10:16 PM
Exit mobile version