शरद पवारांचा अजित पवारांवर विश्वास नाही…; केंद्रीय मंत्र्यांचं खळबळजनक विधान

शरद पवारांचा अजित पवारांवर विश्वास नाही…; केंद्रीय मंत्र्यांचं खळबळजनक विधान

राज्याच्या राजकारणातील सर्वात सक्रिय पवार कुटुंबियांबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर विश्वास नाही. त्यांना धमकीमुळे विरोधी पक्षनेते पद मिळालं आहे, नाहीतर विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेस हे दुसऱ्याला देणार होते, असं मोठं विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजयकुमार मिश्रा सध्या संघटनात्मक बांधणीसाठी राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघात बैठका घेत आहेत. दरम्यान साताऱ्यातील कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं आहे.

यावेळी अजित पवारांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता, त्यालाच अजयकुमार मिश्रांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा अजित पवार समझोता करणारे आहेत. त्यामुळे राहुल गांधी व अजित पवार यांच्यावर काय बोलायचे, राहुल गांधी यांच्या सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेला आम्ही गांभीर्याने घेत नाही. कारण त्यांच्याच पक्षातील लोक राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही, असा आरोपही अजयकुमार मिश्रांनी केला आहे.

यासह त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर टीका केली आहे. देशांतर्गत समस्या सोडवून जागतिक स्तरावर देशाला समृद्ध, शक्तिशाली बनवण्याचे काम भाजप करत आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला धोका दिला आहे. ठाकरेंमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीत अडथळ आला असून महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला आहे, असा गंभीर आरोप मिश्रांनी केला आणि ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला यापुढे प्रगतीपथावर नेण्यासाठी काम करणाऱ्यांना सोबत घेऊन भाजपची वाटचाल सुरु आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.


टेरर फंडिंग प्रकरणी मोठा खुलासा; छोटा शकीलला भारतातून पाकिस्तानात पाठवले कोट्यवधी रुपये

First Published on: January 18, 2023 5:20 PM
Exit mobile version