एक किलो धान्य महिनाभर काकाने खाल्ले का?; आनंदाचा शिधावरून अजित पवारांचे टीकास्त्र

एक किलो धान्य महिनाभर काकाने खाल्ले का?; आनंदाचा शिधावरून अजित पवारांचे टीकास्त्र

Ajit pawar Cleares his stand on Entre in BJP

 

जालनाः गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने राज्यातील जनतेला आनंदाचा शिधा देण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती, परंतु या आनंदाच्या शिधात 100 रुपयांत शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो डाळ, एक किलो तेल देण्यात येणार आहे, परंतु राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा संप आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणींमुळे आनंदाचा शिधा पोहोचण्यात विघ्न आले. आनंदाचा शिधाविनाच गुढीपाडवा साजरा झाला. यावर टीका करताना एक किलो धान्य महिनाभर यांच्या काकाने खाल्ले आहे का, असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. एक किलो धान्यात त्यांनी त्यांचे कुटुंब चालवून दाखवावे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात गोरगरिबांची चेष्ठा, मस्करी सुरू आहे, असे टीकास्त्र अजित पवार यांनी सोडले.

जालन्यातील घनसावंगी येथे तिर्थपुरीमध्ये इथेनॉल प्रकल्पाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी सरकारकडून करण्यात येणार्‍या जाहिरात खर्चावरही टीका केली. ते म्हणाले, सगळीकडे निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान लावले गेले आहे. कशाचा बोडक्याचा गतिमान. काय गतिमान? तुम्ही रोज तुमचे फोटो आम्हाला बळजबरीने बघायला लावता. पेपर उघडल्यावर यांचे फोटो असतात. याऐवजी शेतकर्‍यांसाठी काय केले ते सांगा ना. सत्तेत आल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारकडून रोज जाहिराती दिल्या जात आहेत.

हे सरकार जनतेचे काम करायला आले आहे की जाहिराती करायला? एखाद्या सणाच्या दिवशी जाहिराती दिल्या तर समजू शकतो, मात्र शिंदे-फडणवीस सरकारची रोजरोज जाहिरात येत आहे. शिंदे-फडणवीस सरकारला पुढील निवडणुकीत पराभवाची धास्ती आहे. म्हणूनच हे उपद्व्याप सुरू आहेत. 9 महिन्यांपूर्वी यांचे सरकार आले. त्यात पदवीधरची निवडणूक लागली. या निवडणुकीत हे पडले. शिवसेनेतून घेतला म्हणून एक कसाबसा निवडून आला. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले. म्हणून जाहिरातीवर खर्च सुरू आहे, असे पवार म्हणाले.

 

 

 

First Published on: March 27, 2023 5:45 AM
Exit mobile version