आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा, अजित पवारांनी केलं अभिनंदन

आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा, अजित पवारांनी केलं अभिनंदन

आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने यंदा शानदार कामगिरी करत आठव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरत देशाची मान उंचावली आहे. कबड्डीत अजिंक्यपद कायम राखत जगभर आपला दबदबा कायम राखणाऱ्या भारतीय कबड्डी संघाचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत भारतीय कबड्डी संघाच्या सर्व खेळाडू, प्रशिक्षकांसह व्यवस्थापकांचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने अजिंक्यपद पटकावले. अंतिम फेरीत भारतीय संघाने इराणच्या संघावर 42-32 अशी सरळ मात करत आठव्यांदा आशियाई अजिंक्यपदावर आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाच्या विजयात महाराष्ट्राचा सुपुत्र अस्लम इनामदारचा मोलाचा वाटा आहे.

अंतिम फेरीत सुरुवातीला इराणच्या संघाने आघाडी घेतली होती. मात्र टीम इंडियाने झुंझार खेळ करत सामन्यात पुनरागमन केले. स्पर्धेत सुरुवातीपासून चांगल्या लयीत असलेल्या भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत इराणी संघावर मात करत जगात आपल्या नावाचा दबदबा कायम राखला आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे.

भारताने आतापर्यंत 8 पैकी 7 वेळा विजेता पद राखले आहे. 2003 चा अपवाद वगळता इराण विजेता होता. भारताचा दबदबा कायम राखत भारताने लीगमध्ये प्रवेश केला.


हेही वाचा : Mumbai Rain : मुंबईत पावसाची संततधार, 49 ठिकाणी झाडांची पडझड


 

First Published on: June 30, 2023 10:03 PM
Exit mobile version