मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी अनावश्यक वक्तव्य करू नये, मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा राज्यपालांना टोला

मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी अनावश्यक वक्तव्य करू नये, मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा राज्यपालांना टोला

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(रविवार) पुणे दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन केलं आहे. तसेच इतर महापालिकेच्या योजनांचं उद्घाटन करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठा जनसमुदाय पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात दाखल झाला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. मात्र, मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी अनावश्यक वक्तव्य करू नये, असा खोचक टोला नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

विकास कामात राजकारण करू नये

राज्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. मला एक गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षात आणून द्यायची आहे की, अलीकडं महत्त्वाच्या पदांवर सन्माननीय व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. ती वक्तव्यं महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या व्यक्तीला पटणारी नाहीयेत आणि मान्य देखील नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि राजमाता जिजाऊंनी संकल्पनेतलं रयतेचं राज्य आणि स्वराज्य स्थापन केलं. महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सत्यशोधक विचारांचा प्रसार केला. या महामानवांच्या उत्तुंग अशा विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे घेऊन जायचा आहे. कोणाच्याही मनात असुया न ठेवता आणि विकास कामात राजकारण न करता हा वारसा आणि महामानवांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत, असं अजित पवार म्हणाले.

मेट्रो सुरू करण्यासाठी १२ वर्ष लागली

१० जूनला पुणे महापालिकेने पुण्यातील मेट्रोबाबतचा ठराव केला होता. परंतु ही मेट्रो सुरू करण्यासाठी जवळपास १२ वर्ष लागली. मधल्या काळामध्ये काही लोकप्रतिनिधींच्या हट्टापायी मेट्रो एॅलेव्हेटकर करायची की अंडर ग्राऊंड करायची, यामध्येच बराच वेळ गेला. परंतु त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कठोर भूमिका घेतल्यामुळे पुणे मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली. मेट्रोच्या कामामुळे पुणेकरांना अनेक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तुमच्या सहनशीलतेला मी अजूनही दाद देतो. परंतु अजून काही काळासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. कारण अशा प्रकारची कामं पुढे वर्षानुवर्षे होत असतात, असं अजित पवार म्हणाले.

१२ किमीच्या प्रवासाला आजपासून सुरूवात करणार

पुणे मेट्रोला आज दुपारपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड मार्गातील परिसरातून सुरूवात करणार आहोत. मेट्रोच्या तिकिटाचे दर १० ते १२ रूपये असणार आहेत. तसेच १२ किमीच्या प्रवासाला आजपासून सुरूवात करणार आहोत. महाराष्ट्रात पहिली मेट्रो २०१४ मध्ये अंधेरी ते घाटकोपर या मार्गादरम्यान सुरू केली. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००६ मध्ये भूमिपूजन केलं होतं. त्यानंतर २०१४ मध्ये पहिल्या मेट्रोला सुरूवात झाली होती. त्यानंतर नागपूरमध्ये २०१९ मध्ये मेट्रोला सुरूवात झाली. ज्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गाने मेट्रोचं विस्तारीकरण सुरू आहे. त्याप्रमाणे इतर शहरांत सुद्धा विस्तारीकरण करण्यासाठी अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे, असं पवार म्हणाले.

विकासाचा वेग वाढवण्यासाठी सहकार्य महत्त्वाचं

मेट्रोच्या कामामध्ये ५० टक्के रक्कम राज्य सरकार आणि ५० टक्के रक्कम केंद्र सरकारची आहे. तसेच १० टक्के रक्कम ही पुणे महापालिकेची आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूरच्या मेट्रोला वेगानं सुरूवात झाली. त्याचपद्धतीने मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि इतर शहरांमध्ये मेट्रोला वेग येऊन मदत झाली पाहीजे. विकासाचा वेग वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य मिळावं आणि विकास कामांमध्ये कोणतंही राजकारण न आणता सर्वांनी एकजुटीने लक्ष द्यायला पाहीजे, अशा प्रकारचा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा : PM Modi Pune Tour Live Update: प्रकल्प पूर्ण करणाऱ्यावर अधिक भर दिला पाहिजे – पंतप्रधान मोदी


 

First Published on: March 6, 2022 1:18 PM
Exit mobile version