शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले आणि बारामतीला आले.., अजित पवारांनी घेतला बावनकुळेंचा समाचार

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले आणि बारामतीला आले.., अजित पवारांनी घेतला बावनकुळेंचा समाचार

भाजपाने मिशन मुंबई हाती घेतल्यानंतर आता २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिशन बारामती हाती घेतलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्याचा दौरा केला. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपच्या मिशन बारामतीवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून बारामतीला काय येता? बारामतीला धडका मारुन काय होणार?, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित करत बावनकुळेंचा समाचार घेतला.

अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गेल्या वेळी माझ्या विरोधात निवडणूक लढवली त्याच्यासहित सगळ्याचं डिपॉझिट जप्त झालं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामतीचा दौरा करणार असल्याचं बोललं जातंय. मात्र त्या कधी येणार माहित नाही. परंतु आल्या तर त्यांचं बारामतीत स्वागत करु, त्यांनी कधीही यावं, असं अजित पवार म्हणाले.

मी माझ्या कामाची सुरुवात पहाटे लवकर उठून करतो. त्यामुळे सलग सातव्यांदा मला बारामतीची लोकं निवडून देत आहेत. लोकांनी मला निवडून दिलं आहे. म्हणून मी काम करत असतो. त्यामुळे बारामतीकर मला लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून देतात, असं पवार म्हणाले.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बावनकुळेंनी पुणे जिल्ह्यात पहिलाच दौरा केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : याकूब मेमन कबर सुशोभीकरणप्ररकणी मुंबई पोलीस उपायुक्त करणार चौकशी


 

First Published on: September 8, 2022 3:35 PM
Exit mobile version