केंद्राच्या फतव्यांमुळे राज्याची आर्थिक शिस्त बघडली, नोटबंदीवरुन अजित पवारांनी फटकारले

केंद्राच्या फतव्यांमुळे राज्याची आर्थिक शिस्त बघडली, नोटबंदीवरुन अजित पवारांनी फटकारले

पुन्हा एकदा देशात नोटाबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे. यावेळी ही घोषणा थेट आरबीआयकडून करण्यात आलेली आहे, त्यानुसार 2 हजारांच्या नोटा यापुढे चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुढील तीन महिन्यात नागरिकांना त्यांच्या जवळील 2 हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे निर्देश आरबीआयकडून देण्यात आलेले आहेत. पण यावरून विरोधकांनी मात्र केंद्र सरकारवर चांगलीच आगपाखड केल्याचे पाहायला मिळत आहे.

2 हजारांच्या नोटबंदी मुद्द्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारला फटकारले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्राच्या या फतव्यामुळे आर्थिक शिस्त बिघडली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. (Ajit Pawar rebuked state’s financial discipline due to Centre’s decision, over demonetisation)

हेही वाचा – चीन पुन्हा बरळला… ‘काश्मीर वादग्रस्त क्षेत्र’; G-20 मध्ये उपस्थित राहण्यास दिला नकार

यावेळी 2 हजार रुपयांच्या नोटबंदीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, “काय चाललंय हे…काल फतवा काढला 2 हजारची नोट बंद… यापूर्वी नोटबंदी झाली होती. मग त्यावेळी दोन हजाराच्या नवीन नोटा आणल्या गेल्या होत्या. परंतु काही वर्षात ही नोटबंदी पुन्हा आली. देशहितासाठी काही निर्णय असेल तर आमचा नेहमी पाठिंबा आहे. परंतु केंद्र सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे, ते आतापर्यंत कोणत्याही सरकारने घेतले नाही. आता केलेली दोन हजाराची नोट बंदी असाच प्रकार आहे. तुम्ही म्हणतात, यामुळे काळा पैसा बाहेर येईल. तसे असेल तर चांगलेच आहे. परंतु महिलांनी कुठेतरी जपून ठेवलेल्या नोटा असतात. त्या पुन्हा त्यांना बदलण्यास जावे लागले. अन् विसरल्या म्हणजे गेले पैसे…दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचे कारण काय? तेही केंद्र सरकार किंवा आरबीआयने सांगितले पाहिजे.”

तसेच, मागे एकदा सरकारने सांगितलं की 500 आणि हजाराची नोट बंद. काल फतवा काढला की दोन हजारांची नोट बंद. याला काय अर्थ राहिला आहे का? आता दोन हजारांच्या नोटा द्या आणि बदलून घ्या. आपल्या देशाने इंदिरा गांधीचा काळ पाहिला, वाजपेयींचा काळ पाहिला, मोदींच्या आधी मनमोहन सिंह पंतप्रधान होते. आपण तो काळही पाहिला. काही निर्णय राज्यकर्ते म्हणून घ्यावे लागतात. नकली नोटा, बनावट नोटा, बाहेरच्या लोकांनी चलन अडचणीत आणायचा प्रयत्न केला बदल करावे लागतात याबद्दल दुमत नाही. पण हे सारखं सारखं का करावं लागतंय? याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. तर 2 हजारांची नोट बंद करण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

First Published on: May 20, 2023 12:35 PM
Exit mobile version