अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावे

अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावे

आजच्या घडामोडी पाहताना जूने चित्र कायम तसच असावे. अजितदादांनी पवार साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावे, असे मनापासून वाटते, अशा शब्दांत नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबूक पोस्टद्वारे भावनिक आवाहन केले.

नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उद्देशून फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली. अजित पवार यांना या पोस्टमधून आवाहन करण्या बरोबरच कौटुंबिक आठवणी शेअर केल्या आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि रोहित पवार या चौघांचा एकत्र असलेला फोटो शेअर करीत अजित पवारांना आवाहन केले आहे. लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते, असे रोहित पवार म्हणाले.

अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमिका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणे हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही. आजच्या घडामोडी पाहताना जूने चित्र कायम तसच असावे. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावे, असे मनापासून वाटते. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत, पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती पवार साहेब होतो.

सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यंत लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत, अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असे वाटते की, आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवे. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसे दूरावू नयेत असे व्यक्तिश: वाटते, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

First Published on: November 25, 2019 5:21 AM
Exit mobile version