Raigad Mahad Helipad : महाडमधील हेलिपॅड का विकलं?

Raigad Mahad Helipad : महाडमधील हेलिपॅड का विकलं?

महाड एमआयडीसीमधील जुने हेलिपॅड

निलेश पवार : आपलं महानगर वृत्तसेवा

महाड : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेऊन जायला आलेले हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी महाडमध्ये कोसळले. त्यामुळे पुन्हा एकदा महाडमध्ये कायमस्वरुपी हेलिपॅडची गरज असल्याकडे लक्ष वेधले जात आहे. वास्तविक
महाड औद्योगिक वसाहतीमधील हेलिपॅड नव्याने उभ्या राहिलेल्या एका कंपनीला विकण्यात आले आहे. त्यामुळे काही वर्षांपासून याठिकाणी खासगी जागेत हेलिकॉप्टर उतरवावे लागत आहे. त्यामुळे शेतजमीन किंवा पडीक जागेत लाखो रुपये खर्च करून हेलिकॉप्टर उतरवण्याची व्यवस्था केली जाते.

महाड ही ऐतिहासिक भूमी आहे. किल्ले रायगड, शिवथरघळ, शेजारील गांधारपाले बौद्ध लेण्या, चवदार तळे अशी अनेक ऐतिहासिक स्थळे महाडमध्ये आहेत. रायगड किल्ल्यावर दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. महत्त्वाच्या कार्यक्रमांना देशातील दिग्गज आणि मान्यवर व्यक्ती उपस्थित राहतात. काही वर्षांपूर्वी रायगडावर येणारे दिग्गज गडावर हेलिकॉप्टरने येत होते. पुढे गडावर होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरण्यास विरोध झाल्यामुळे गडावर हेलिकॉप्टर उतरवणे बंद करण्यात आले. त्यानंतर पायथ्याशी पाचाड येथे तात्पुरत्या स्वरूपात हेलिपॅड तयार करून लाखो रुपयांचा चुराडा करण्यास सुरवात केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे हेलिपॅड तयार केले जातात.

हेही वाचा… Raigad Mahad Adivashi : आदिवासींचा ‘विकास’ आणखी किती कोस दूर?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या चवदार तळे आंदोलनामुळे महाडमध्ये लाखो भीमसैनिक येत असतात. विविध कार्यक्रमाना मंत्री, दिग्गज नेते येतात. महाड आणि पूर हेदेखील समीकरण आहे. त्यामुळे पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीत हेलिकॉप्टर उतरवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. महाड परिसराचा आढावा घेतल्यानंतर तालुक्यात कायमस्वरूपी हेलिपॅडची गरज असल्याचे जाणवते. महाडजवळ मुंबई-गोवा महामार्गालगत मोहोप्रे आदिवासी वाडीजवळ नव्याने एक जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग गेली अनेक वर्षात खासगी जागेत हेलिपॅड तयार करून लाखो रुपयांचा चुराडा करत आहेत.

हेही वाचा… Matheran Hill Station : माथेरानमध्ये अश्व शर्यती, फुटबॉल स्पर्धा, ऑर्केस्ट्रा अन् बरंच काही

महाड औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र उभे राहिले आहे. त्याचवेळी येथे २३.९३ हेक्टरमध्ये जवळपास २४ प्लॉट पाडण्यात आले. त्यावेळी हेलिपॅडही उभारण्यात आले होते. हे हेलिपॅड अनेक वर्ष वापरात होते. मात्र पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात शासनाने स्वारस्य न दाखवल्याने हे क्षेत्र ओसाडच राहिले आहे. यामुळे पंचतारांकितचा दर्जा शासनाने काढून टाकला. परिणामी काही महिन्यांपूर्वी हे हेलिपॅड देखील या परिसरात येणाऱ्या एका कंपनीला विकण्यात आले आहे.

महाड आमशेत गावानजीक हे हेलिपॅड होते. याच जागेवर आता ओरिएन्ट अॅरोमॅटिक अॅन्ड सन्स लिमिटेड या कंपनीचे काम सुरु आहे. या हेलिपॅडचा वापर ज्या ज्या वेळी महाडमध्ये आपत्कालीन स्थिती उद्भवली त्या त्या वेळेस वापर झाला आहे. म्हणूनच आता महाडला कायमस्वरुपी हेलिपॅडची गरज निर्माण झाली आहे.

(Edited by Avinash Chandane)

First Published on: May 5, 2024 1:52 AM
Exit mobile version