अलीकडे विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा, अजित पवारांचा मशिदींच्या भोंग्यांवरुन भाजपला टोला

अलीकडे विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा, अजित पवारांचा मशिदींच्या भोंग्यांवरुन भाजपला टोला

मशिदीवरील लाऊडस्पीकर काढण्यात यावे अशी मागणी भाजपने महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. अलीकडच्या काळात विकासाच्या मुद्द्यांना सोडून इतर गोष्टींवर अधिक चर्चा करण्यात येत आहे. कोणी कोणत्या मुद्द्यावर बोलायचे हे त्याचे मत असते. लोकांनी अशा विषयांना महत्त्व देऊ नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला सुनवले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला, यावेळी महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्याची माहिती दिली आहे. मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्याचा मुद्दा भाजपने उठवला असून यावर माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा केली जात असल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

कुणी कुठला मुद्दा घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार कुठलंही असो सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जे सांगेल त्याची अंमलबजावणी सरकारला करावी लागते आणि मुद्दा पटला नाही तर अपीलही करावे लागते. कोर्टाने काय निर्णय दिला आहे तो वाचला नाही मात्र त्याची माहिती घेऊन कोर्टाचा अवमान होणार नाही असा निर्णय घेतला जाईल असेही अजित पवार म्हणाले.

जातीय सलोखा राहण्याच्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न केला पाहिजे. पक्षाच्या नेत्यांनीही तीच भूमिका मांडण्याचं काम केलं पाहिजे. यंदाच्या १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज ७५ वर्ष पूर्ण होत असताना जग कुठला विचार करतंय आणि आपण कुठल्या विषयांमध्ये जनतेला गुंतवून ठेवतोय आणि कुठल्या विषयाला महत्त्व देतोय याचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन झालं पाहिजे असे सांगतानाच जनतेनेही या विषयाचा फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे असे वैयक्तिक मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

कर्मचाऱ्यांना शेवटची संधी अन्यथा कठोर कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर परतण्याची सवलत देण्यात आली होती. जे कर्माचारी ३१ मार्चपर्यंत कामावर परतणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच कंत्राटी पद्धतीने त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यात येईल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.


हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांना आज शेवटची संधी, अन्यथा उद्यापासून कठोर कारवाई होणार, अजित पवारांचा पुन्हा इशारा

First Published on: March 31, 2022 1:13 PM
Exit mobile version