एसटी कर्मचाऱ्यांना आज शेवटची संधी, अन्यथा उद्यापासून कठोर कारवाई होणार, अजित पवारांचा पुन्हा इशारा

ajit pawar

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. आंदोलनादरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर परतण्याचे आवाहन केले होते. ३१ मार्चची मुदत संपत आली असून आता १ एप्रिलपासून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांना शेवटचा दिवस कामावर परतण्यासाठी आहे. जे कर्मचारी येणार नाहीत त्यांच्या जागी कंत्राटीपद्धतीने नवीन कर्मचाऱ्यांना घेण्यात येईल असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच निर्बंधमुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. ३१ तारखेपर्यंत मागे ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांना सूचना दिल्या होत्या की, ३१ तारखेपर्यंत सर्वांना आणखी एक संधी द्या. आता तशी संधी दिली होती. उद्यापासून कठोर निर्णय घेतला जाणार असल्याची साधारण शक्यता आहे. कठोर भूमिका म्हणजे ज्यांना काढून टाकले आहे. त्यांना बाजूला करुन नवीन भरती करण्यात येऊ शकते. किंवा काही बाबतीमध्ये जसे बेस्ट आणि पीएमपीएलने इलेक्ट्रॉनिक बसेस पर किलोमीटर घेतल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले तेव्हा १०० बसेसचे उद्घाटन झाले. या बसेस जशा कंत्राटकरुन घेतल्या तसाच पर्याय स्वीकारला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान अजित पवार पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांना १० तारखेपर्यंत पगार करण्याचे ठरवले आहे. विलिनीकरण करणं शक्य नाही. जो अहवाल आला तो मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे. त्या अहवालात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या देखील पूर्ण केल्या आहेत. पगारसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. उद्या सरकारने कोणताही निर्णय घेतला आणि त्यानंतरन न्यायव्यवस्थेने निर्णय घेतला तर ती न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. न्यायव्यवस्थेने ५ तारखेपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु मुदत संपल्यावर संबंधित विभाग कारवाई करु शकते असे अजित पवार म्हणाले आहेत.

निर्बंधमुक्तीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर अजित पवार म्हणाले की, नियमावली उद्यापासून बऱ्याच अंशी शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादीकडून जनता दरबार सुरु करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्र निर्बंध मुक्त होणार की नाही याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंधांबाबत निर्णय घेतील. सगळ्यांसोबत चर्चा केल्यानंतर पूर्णपणे टास्क फोर्सशी बोलतील आणि केंद्र सरकारच्या सूचनांची माहिती घेऊन राज्याच्या जनतेच्या हिताबाबत कारवाई केली जाईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

ईडीच्या कारवाईवर अजितदादांचे नो कमेंट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वकिलांच्या घरी ईडीच्या पथकाने छापेमारी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी उकेंच्या घरातील मोबाईल, लॅपटॉप आणि कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न करण्यात आला होता. यावर अजित पवार यांनी मला त्याच्याबाबत काही सांगायचे नाही नो कमेंट असे उत्तर दिल आहे.


हेही वाचा : सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांपेक्षा स्वतःच्याच मालमत्तांची चिंता भारी, नालेसफाईवरुन आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका