उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामती दौरा, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी करणार मतदान

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामती दौरा, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी करणार मतदान

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज(रविवार) बारामती दौरा आहे. मध्यवर्ती बँकेसाठी अजित पवार मतदान करणार आहेत. अजित पवार यांच्यासह १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर पुणे जिल्ह्यातील ७ जागांसाठी मतदान सुरू आहे. त्याचसोबतच त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मागील निवडणुकीत अजित पवार यांच्याकडे २१ पैकी २१ जागा होत्या. परंतु यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत ७ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यासाठी पवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

कोणत्या जागांवर होणार मतदान

तालुकास्तरीय ‘अ’ वर्ग मतदारसंघातील हवेली, मुळशी आणि शिरूर अशा तीन जागांसाठी मतदान करण्यात येणार आहे. तर दोन जागांसाठी महिलांसाठी राखीव आहेत. या दोन जागांसाठी तीन महिला रिंगणात उतरल्या आहेत. तसेच बारामती तालुक्यात ४ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याचसोबतच सर्व जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत.

शिरूरमधून आमदार अशोक पवार यांच्या विरोधात आबासाहेब गव्हाणे, हवेलीतून बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास दांगट यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर मुळशी तालुका मतदारसंघात बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील चांदेरे यांच्यात लढत होणार आहे. ‘क’ वर्ग मतदासंघातून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते प्रदीप कंद यांच्या विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले रिंगणात उतरणार आहेत. तर ‘ड’ वर्ग मतदार संघातून बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक दिगंबर दुर्गाडे विरूद्ध दादासाहेब फराट यांच्यात लढत होणार आहे.

दरम्यान, बँकेच्या २१ संचालक पदांपैकी २३ डिसेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १४ जण बिनविरोध झाले आहेत. बिनविरोध झालेल्या जागांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांचाही समावेश आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ४ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.


हेही वाचा : Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेने ५० दिवसातच ओमिक्रॉनला घातली वेसण! यशोगाथा


 

First Published on: January 2, 2022 10:48 AM
Exit mobile version